मातापित्यांचा असाही अत्याचार
चारित्र्यावर धरला संशय
वरूड,
Varud case आई वडिलांनी पोटच्या मुलीच्या चारित्र्यावर संशय व्यक्त करीत तिला मारहाण करून तिच्या डोक्यावरील केस कापल्याची धक्कादायक घटना वरूड पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडितेची आई, वडील, सावत्र वडील व१६ वर्षीय पीडिता हे सारे वरूड शहरातील मिरची प्लॉट येथे राहतात.
Varud case पीडित युवतीचा एका अज्ञात युवकासोबत प्रेमसंबंध असल्याच्या संशयावरून तिला १५ एप्रिल रोजी आई व सावत्र वडील यांनी मानसिक त्रास दिला. पीडितेने विरोध केल्याने त्यांनी कमरेच्या पट्ट्याने मारहाण केली व घरी असलेल्या इलेक्ट्रीक मशीनने तिचे केस कापून टक्कल केले. त्यामुळे पीडितेने आई व सावत्र वडिलांच्या भीतीपोटी १६ एप्रिल रोजी त्यांच्या विरोधात तक्रार देण्यासाठी पोलिस स्टेशन गाठले. या घटनेमुळे पीडितेला भीती वाटत असल्याने ती आईसोबत राहायला तयार नव्हती. त्यामुळे तिला १६ एप्रिल रोजी बालकल्याण समितीत हजर करण्यात आले. पीडितेने संपूर्ण घटना बालकल्याण समितीसमोर मांडली. त्यानंतर तिला शासकीय मुलीच्या वसतिगृहात ठेवण्यात आले. तेव्हापासून ती तेथेच राहात आहे. पीडितेने या प्रकरणी कुणाच्याही दबावत न येता स्वेच्छेने बयाण नोंदविले. दिलेल्या बयाणावरून आणि बालकल्याण समितीच्या पत्रावरून वरूड पोलिसांनी २१ एप्रिल रोजी मातापित्याविरोधात गुन्हा दाखल केला. त्यांना २४ एप्रिल रोजी अटक करून न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. गुन्ह्याचा तपास पोलिस उपनिरीक्षक पुजा माळी करीत आहे.