कमाल ४५ तर किमान २८ अंशाची नोंद
वर्धा,
Wardha's temperature उन्हाळा सुरू होताच विदर्भात चंद्रपूर जिल्ह्याला उच्च तापमानाचा मान मिळतो. काही वर्षांपूर्वी तर चंद्रपूरने देशात उच्चांक गाठल्याची नोंद आहे. मात्र, यंदाचा उन्हाळा वर्धेकरांसाठी मोठा त्रासदायक ठरला आहे. वर्धेने चंद्रपूरला मागे टाकत अकोल्यासोबत स्पर्धा करीत विदर्भात सर्वाधिक उष्णतामानाचा किताबच मिळविला आहे. आज शनिवार २५ रोजी पुन्हा एकदा वर्धेने तापमानात मुसंडी मारत कमाल ४५ तर किमान २८ अंशाची नोंद घेण्यात आली.
Wardha's temperature यावर्षी वर्धेकरांना मे महिन्याचा अनुभव एप्रिल महिन्यातच आला आहे. मागील आठवड्यात वर्धेचे तापमान सलग दोन-तीन दिवस ४५ अंशावर होते. दोन-तीन दिवसांची उसंत घेत पुन्हा शनिवारी ४५ अंशाची नोंद घेण्यात आली. सकाळी ९ वाजतापासूनच सूर्य आग ओकू लागला. दिवसभर रस्तेही निर्मनुष्य होते. मोठ्या उकाड्यात नागरिकांनी घराबाहेर पडणे टाळल्याचे दिसून आले. चौकाचौकातील रसवंत्यांनाही ग्राहकांची वाट होती. पशु-पक्ष्यांनाही उन्हाच्या तीव्रतेची झळ पोहचताना दिसून येत आहे. भरीस भर म्हणून आता शहरालगतच्या काही गावांमध्ये विजेचा लपंडाव सुरू झाला. अतिउष्णतेमुळे घरातील पंखे, कुलरसह एसी सुद्धा काम करीत नाही. मध्यरात्री उशिरा तापमानात घट झाल्यानंतरच कुलरची थंडी हवा दिलासा देणारी ठरत आहे. उष्माघाताचा धोका टाळण्यासाठी दुपारच्या सुमारास नागरिकांनी घराबाहेर पडणे टाळण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे. शिक्षण विभागानेही सकाळी १० वाजेपर्यंतच शाळा घेण्याच्या सुचना सर्व शाळांना दिल्या असल्या तरी शहरातील काही खाजगी शाळा सकाळी ११.३० पर्यंत सुरू आहेत. शनिवारी ४५.२८ अंशाची नोंद घेण्यात आली आहे. या खालोखाल अमरावती आणि अकोला जिल्ह्याचे तापमान कमाल ४५ तर किमान २६ अंश नोंदविण्यात आले आहे. त्यामुळे नागरिकांनी स्वत:ची काळजी घेण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.