पाणी टंचाईची तीव्रता वाढली

    दिनांक :25-Apr-2026
Total Views |
दोन गावात टँकरने पाणीपुरवठा
25 गावात विहिर अधिग्रहणचे प्रस्ताव
सहा विहिरींना मान्यता

आर्णी, 
Water shortage आर्णी तालुक्यात मार्च महिन्यात अखेरपर्यंत शून्यावर असलेली टँकर व विहीर अधिग्रहणाची संख्या एप्रिल महिन्यात वाढत चालली आहे. सध्या आर्णी तालुक्यात दोन टँकरने पाणीपुरवठा करण्यात येत आहे. तालुक्यातील 25 गावांत पाणीटंचाई असून तेथील ग्रामपंचायतने विहिर अधिग्रहण प्रस्ताव पंचायत समिती व तहसीलला देण्यात आले आहेत. आर्णी पं. स. कडून जिल्हा कार्यालयाला पाठलिलेले अधिग्रहण सूचीतून केवळ 6 विहिरींना मान्यता देण्यात आली आहे. त्यामध्ये 2 विहिरी टँकर भरण्यासाठी अधिग्रहित करण्यात आल्या आहेत.
 
 
y25Apr-Tanker
 
यावेळी एप्रिल महिन्यात उन्हाचा पारा पार 44 डिग्री सेल्सिअसपर्यंत भडकला आहे. प्रकल्पातील व भुगर्भातील जलसाठ्यात घट होत आहे. भुजलस्तर खाली गेल्याने विहिरीतील पाण्याची पातळी तळ गाठत आहे. काही गावातील सार्वजनिक विहिर कोरड्या पडल्या आहेत. सुरुवातीला पाणीटंचाईचे चटके जाणवणार नाही, असे वाटत असतानाच गेल्या वर्षीच्या तुलनेत एप्रिलमध्येच टँकर सुरू करण्याची वेळ प्रशासनावर आली आहे. ग्रामीण भागातील नागरिकांना पाण्यासाठी वणवण भटकंती करावी लागत आहे. पाणीपुरवठा योजनेवर कोट्यवधी रुपयांचा खर्च करूनही उन्हाळ्यात पाणीटंचाईची झळ जनतेला सोसावी लागत आहे. आर्णी येथे सध्या दोन टँकरने पाणी पुरवठा पाळोदी व कारेगाव पारधी बेडा येथे सुरु आहे. तर काही ठिकाणी खासगी टँकरने पाणीपुरवठा करण्यात येत आहे. आर्णी तालुक्यात 25 ठिकाणी विहिरींचे अधिग्रहण करण्याचे प्रस्ताव आले व ते वरिष्ठ कार्यालयात पाठविण्यात आले. त्यामध्ये सावळी, जवळा, धनसिंग हेटी, ब्राम्हणवाडा, ब्राम्हणवाडा तांडा, माळेगाव, सावळी सदोबा व टँकरसाठी पाळोदी येथिल विहिरींचे अधिग्रहण करण्यात आले आहे.
 
 
Water shortage  तर नागरिकांना त्रास होता कामा नये यासाठी केळझरा, वरठी, कृष्णनगर, अंजनखेड, अंबोडा, सुकळी, ब्राम्हणवाडा, झापरवाडी, कारेगाव, दातोडीसह जुना थड, नविन थड, सुधाकरनगरसह 25 गावांमध्ये पेयजल संकट बळावले आहे. त्यातील काही गावातील विहिरी अधिग्रहित केल्या आहेत. काही ठिकाणच्या पाण्याची समस्या पाहून विहिर अधिग्रहणचे प्रस्ताव पाठविण्यात आले, परंतु त्यांना अद्यापपर्यंत मान्यता मिळाली नाही. लवकरात लवकर या समस्येचा कायमस्वरूपी उपाययोजना करून दरवर्षी होणारी पाणीटंचाई पासुन सुटका करून द्यावी, अशी मागणी नागरिक करित आहे.