ऐनवेळी हमालांचे काम बंद आंदोलन

    दिनांक :26-Apr-2026
Total Views |
अंजनगाव बाजार समितीतील प्रकार
उन्हामुळे हमालाला आली भोवळ
 
 
अंजनगाव सुर्जी, 
Agricultural Produce Market Committee येथील कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक मंडळ अपात्र घोषित झाल्याच्या दुसर्‍याच दिवशी समितीच्या आवारात हमाल चक्कर येऊन पडल्यानंतर नेट लावण्याच्या मागणीसाठी हमालांच्या कामबंद आंदोलनामुळे खरेदी-विक्रीचे व्यवहार ठप्प झाले. भर उन्हात शेतकरी व खरेदीदारांना तासन्तास ताटकळत राहावे लागल्याने संतापाचे वातावरण निर्माण झाले होते. परंतु व्यापार्‍यांच्या मध्यस्थीने वाद निवळला
 
 
krashi
 
शनिवारी अंजनगाव सुर्जी कृषी उत्पन्न बाजार समितीत गहू व धान्याचा आठवडी बाजार भरतो. यावेळी शेतकरी व व्यापार्‍यांची मोठी गर्दी असते. शनिवार, २५ एप्रिल रोजी दुपारी ११ वाजताच्या सुमारास यार्डात हमाली करणारा अब्दुल जुनैद अ. रशीद ( ३१) हा वाढत्या उन्हामुळे उष्माघाताच्या फटक्याने चक्कर येऊन कोसळला. त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करावे लागले. काही दिवसांपूर्वीच हमालांनी समितीकडे वाढत्या तापमानाच्या पृष्ठभूमीवर यार्डात सावलीसाठी ‘नेट’ लावण्याची तोंडी मागणी केली होती. मात्र त्याकडे दुर्लक्ष झाल्याने घडलेल्या घटनेनंतर हमालांचा संताप अनावर झाला. ‘नेट लावण्याचे लेखी आश्वासन मिळाल्याशिवाय काम करणार नाही’, असा पवित्रा घेत सर्व हमालांनी काम बंद करून कार्यालय गाठले. हमाल कार्यालयात पोहोचले असता समिती कार्यालयात एकही कायमस्वरूपी जबाबदार अधिकारी आढळला नाही. बाजार समितीत केवळ दोनच कायमस्वरूपी कर्मचारी असून प्रभारी सचिव सुटीवर होते. त्यामुळे शेतकर्‍यांचा माल मोजमाप व भराईसाठी रखडला. भर उन्हात शेतकर्‍यांना मनस्ताप सहन करावा लागला.
 
 
Agricultural Produce Market Committee  अखेर व्यापारी विजय भांबुरकर, जगदीश शेळके, मो. सिद्दीक, संजय चोरे यांनी पुढाकार घेत हमालांची समजूत काढली. चर्चेअंती ‘नेट न लावल्यास उद्यापासून सकाळी ८ ते ११ याच वेळेत हमालीचे काम होईल, त्यानंतर कोणताही हमाल काम करणार नाही’, या अटीवर दुपारी अडीच वाजल्यानंतर हमालांनी रखडलेली मापे व माल भराईचे काम सुरू केले. व्यापार्‍यांच्या वेळीच हस्तक्षेपामुळे वाद विकोपाला जाण्यापासून बचावला.
 
 
संचालक मंडळ अपात्र झाल्यानंतर जिल्हा उपनिबंधक कार्यालयाने तातडीने अनुभवी प्रशासकाची नेमणूक करणे अपेक्षित होते. मात्र नियंत्रणाचे व प्रशासकाअभावी बाजार समितीचे कामकाज वार्‍यावर असल्याचे या घटनेने स्पष्ट झाले आहे. कर्मचारी अपुरे असल्याने बाजार समितीच्या व्यवस्थापनाचे धिंडवडे निघाल्याची भावना शेतकरी व व्यापार्‍यांनी व्यक्त केली.
(एएम २६ एपी- कामबंद : कामबंद आंदोलन करताना हमाल वर्ग)