नाशिक
Ashok Kharat स्वतःला ज्योतिषी आणि आध्यात्मिक गुरू म्हणून सादर करणाऱ्या अशोक खरात याच्या अडचणी दिवसेंदिवस वाढत असून, त्याच्याविरुद्ध आणखी एका गंभीर आर्थिक फसवणुकीचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे. आधीच अनेक महिलांच्या लैंगिक शोषण आणि आर्थिक गैरव्यवहारांच्या आरोपांखाली कारागृहात असलेल्या खरातने आता एका चार्टर्ड अकाउंटंट महिलेची तब्बल ८ कोटी ७६ लाख रुपयांची फसवणूक केल्याचे समोर आले आहे.
या प्रकरणातील तक्रारदार महिला व्यावसायिकदृष्ट्या चार्टर्ड अकाउंटंट असून, त्या अशोक खरातच्या ‘शिवनिका ट्रस्ट’मध्ये विश्वस्त म्हणून कार्यरत होत्या. २०१८ ते २०२३ या कालावधीत खरातने तिचा विश्वास संपादन करत, तिच्या कुटुंबावर संकट येणार असल्याचे भाकीत केले. विशेषतः तिच्या आई-वडिलांच्या जीवाला धोका असल्याची भीती दाखवत, विविध धार्मिक विधी आणि पूजांच्या नावाखाली त्याने वेळोवेळी मोठ्या रकमा उकळल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.
महिलेच्या लक्षात Ashok Kharat ही फसवणूक आल्यानंतर तिने नाशिकमधील सरकारवाडा पोलीस ठाण्यात धाव घेतली. शुक्रवारी रात्री उशिरा या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. या नव्या गुन्ह्यामुळे अशोक खरातविरुद्ध नोंदवलेल्या एकूण प्रकरणांची संख्या आता १२ वर पोहोचली आहे. यापैकी आठ गुन्हे महिलांच्या लैंगिक शोषणाशी संबंधित असून, उर्वरित चार गुन्हे आर्थिक फसवणूक आणि खंडणीशी संबंधित आहेत.दरम्यान, नाशिकसह राज्यातील इतर भागांमध्येही खरातविरुद्ध तक्रारी नोंदवण्यात आल्या आहेत. पोलिसांकडून त्याच्या संपूर्ण नेटवर्कचा आणि आर्थिक व्यवहारांचा सखोल तपास सुरू असून, त्याच्या ट्रस्टच्या माध्यमातून चालणाऱ्या संशयास्पद हालचालींचा छडा लावण्याचा प्रयत्न केला जात आहे. सिन्नर तालुक्यातील ट्रस्टच्या नावाखाली केलेल्या कथित विधी, त्यातून उकळलेली रक्कम आणि निधीचा गैरवापर या सर्व बाबी तपासाच्या केंद्रस्थानी आहेत.एका अन्य लैंगिक अत्याचार प्रकरणात न्यायालयाने अशोक खरातला २६ एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. या संपूर्ण प्रकरणामुळे नाशिक जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली असून, भोंदूगिरीच्या नावाखाली भाविकांची फसवणूक करणाऱ्या अशा कथित बाबांवर कठोर कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून जोर धरत आहे.