सिंदेवाही तालुक्यातील रत्नापूर येथील घटना
नवरगाव/ सिंदेवाही,
Attack on forest guard सिंदेवाही तालुक्यातील रत्नापूर येथे वनरक्षकावर हल्ला करून जखमी केल्यानंतर वाघीणीचाही शेतशिवारात मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे. रत्नापूर येथील शंकरपटाजवळ दामोदर गनबाजी लोधे यांचे सर्वे क्रमांक 1037 हे शेत आहे. ही वाघिणी नेहमीच आपल्या तीन बछड्यासह शिवटेकडी नजीक बर्याच दिवसापासून वास्तव्यास होती. या वाघिणीचे दर्शन बर्याच गावकर्यांना झाले. तिचा बंदोबस्त करण्यात यावा, अशी रत्नापूर, नवरगाव, नाचणभट्टी, मीनघरी व आजूबाजूच्या परिसरातील जनतेची गेल्या अनेक दिवसापासून मागणी होती.
रत्नापूर शेतशिवार परिसरामध्ये रविवारी रोजी दुपारी 12.30 वाजताच्या सुमारास मक्याच्या शेतीमध्ये ही वाघीण भ्रमण करीत असल्याचे स्थानिक ग्रामवासियांच्या निदर्शनास आले. तिला बघण्यासाठी लोकांनी गर्दी केली होती. दरम्यान, नाचणभट्टीचे वनरक्षक सज्जन पारेकर व सोबत असलेले वन मजूर दुपारी गस्त घालत असताना त्यांच्यावर या वाघिणीने हल्ला केला. त्या हल्ल्यात वनरक्षकाच्या पायाला व हाताला गंभीर इजा झाली. आजूबाजूच्या शेत शिवारातील लोक व गावातील लोक एकत्र येऊन वाघिणीला हुसकावून लावण्यासाठी प्रयत्न केला. वाघिणीचा पाठलाग केल्याने आणि उन्हाच्या तीव्रतेमुळे वाघीण थकलेली होती. पाण्याच्या अभावी आणि धकलेल्या स्थितीत त्या वाघिणीचा दामोदर लोधे यांच्या शेतशिवारात मृत्यू झाला असावा असे गावकर्यांचे म्हणणे आहे. जखमी वनरक्षकाला चंद्रपूर येथील जिल्हा समान्य रुग्णलयात दाखल करण्यात आले आहे.
Attack on forest guard घटनास्थळी उपवनसंरक्षक, सहा. वनसंरक्षक (तेंदू), सहा. वनसंरक्षक (प्रादेशिक व वन्यजीव) ब्रम्हपुरी, राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्रधिकरणाचे प्रतिनिधी बंडू धोतरे आदींनी घटनास्थळाची पाहणी करून पंचनामा केला. मृत वाघीणीचे वय अंदाजे 9 ते 10 वर्ष होते. पुढील कारवाईकरिता मृत वाघीणीचे शव सिंदेवाही येथील मध्यवर्ती काष्ठ भांडार येथे हलविण्यात आले. तेथे डॉ रविकांत खोब्रागडे, डॉ कुंदन पोडचलवार, डॉ सोनकुसरे यांनी मृत वाघिणीचे शवविच्छेदन केले व पंचासमक्ष मृत वाघाचे दहन करण्यात आले.