Dhanki Nagar Panchayat अतिरिक्त आधार संच सुरू व्हावा आणि जनसामान्यांची आधार दुरुस्ती व अपडेटसाठी होणारी फरफट थांबावी, यासाठी ढाणकी नगर पंचायतने ठराव घेऊन अतिरिक्त आधार संचाची मागणी केली. तसा प्रस्ताव प्रशासनाकडे पाठवला असताना यावर कोणतीही कारवाई झालेली दिसत नाही.
हा ठराव घेऊन आता दोन महिने होत आहेत. त्यामुळे नगर पंचायत प्रशासनाने व लोकप्रतिनिधींनी केलेल्या या मागणीची जिल्हा प्रशासन दखल घेत नाही की काय अशी प्रतिमा जनमानसात व लोकप्रतिनिधींमध्ये निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. जनतेने निवडून दिलेल्या लोकप्रतिनिधींनी घेतलेल्या ठरावाला एवढा मोठा प्रशासकीय वेळ लागत असल्यास शासन व प्रशासनाची असलेली कर्तव्याची नाळ ही जनतेसोबत जुळली आहे का हा प्रश्न यावरून प्रकर्षाने पुढे येतो. जनतेची अडचण आणि कोंडी लक्षात घेऊन लोकप्रतिनिधी ठराव घेत असतील तरीही प्रशासन यावर गंभीर नसेल तर ते जनतेचे दुर्दैवच म्हणावे लागेल.
Dhanki Nagar Panchayat केवळ आधार संचाच्या मागणीला एवढा वेळ लागत असेल तर जनतेच्या नियमित मागण्यांसाठी प्रशासन किती वेळखाऊपणा करेल याचा अंदाज येतो. येणाèया काही दिवसांमध्ये इयत्ता दहावी व बारावीचा निकाल लागल्यानंतर व प्रवेश प्रक्रिया सुरू झाल्यानंतर अनेक विद्यार्थ्यांना आपल्या नावांमधील चुका दुरुस्त करण्यासाठी आधार संचाकडे वळावे लागते. ढाणकी हे नगर पंचायत क्षेत्र आता अपर तहसील म्हणून मंजूरही झाले आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने लोकप्रतिनिधींच्या मागणीच्या विचार करून अतिरिक्त आधार संचाची मागणी त्वरित पूर्ण करून वयोवृद्ध ज्येष्ठ नागरिकांची विद्यार्थ्यांची व गरोदर माता भगिनींची ही कुचंबणा थांबवावी, अशी मागणी जनतेतून होत आहे.