धीरेंद्र शास्त्रींच्या वक्तव्यावरून शिवप्रेमी संतप्त

    दिनांक :26-Apr-2026
Total Views |
- छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेसमोर निषेध : ठिकठिकाणी पोलिसांत तक्रार

गोंदिया, .
Dhirendra Shastri कथावाचक धीरेंद्र शास्त्री उर्फ बागेश्वर बाबा या कथावाचकाने महाराष्ट्र राज्याचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी अत्यंत संतापजनक असे वक्तव्य नागपूर येथे आयोजित कार्यक्रमात केले. त्या वक्तव्याच्या विरोधात गोंदिया शहरातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेसमोर आंदोलन करून धीरेंद्र शास्त्री याच्या छायाचित्राला जोडेमारून निषेध व्यक्त करण्यात आला. दरम्यान, धीरेंद्र शास्त्री याच्यावर कठोरात कठोर कारवाईची मागणी करण्यात आली.
 
 
shastri
 
छत्रपती शिवाजी महाराज हे एकट्या महाराष्ट्राचेच नव्हे, तर संपूर्ण भारतीयांचे प्रेरणास्थान आहेत. गुलामीच्या बेड्या फेकून सर्वसामान्यांना हाताशी धरत रयतेचे राज्य निर्माण केले. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्वराज्यात जाती, पातीला स्थान नव्हते. तर अगदी तळागाळातील व्यक्तींचा देखील त्यांनी आदर राखला. त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराज यांचे आदराचे स्थान अढळ आहे. अशा रयतेच्या राजाबद्दल धीरेंद्र शास्त्री या कथावाचकाने नागपूर येथे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मोहन भागवत यांच्यासमक्ष ‘छत्रपती शिवाजी राजे यांनी आपण आता थकले आहोत. त्यामुळे मी हे माझे स्वराज्य आणि माझे मुकूट आपल्या चरणी ठेवत आहे. त्याचे रक्षण आपण करावे, असे रामदास स्वामी यांना म्हटले होते.’ असे वादग्रस्त विधान केले. या विधानामुळे संपूर्ण महाराष्ट्रात या वक्तव्यावर संताप व्यक्त करण्यात येत असून धीरेंद्र शास्त्री याचा निषेध व्यक्त करण्यात येत आहे.
 
 
Dhirendra Shastri  छत्रपती शिवाजी महाराज यांच्या संपूर्ण आयुष्यात रामदास स्वामी यांच्याशी छत्रपती शिवाजी महाराज यांचा कधी संबंध आला नाही. असे असताना धीरेंद्र शास्त्री याने रामदास स्वामी याचे उदात्तीकरण करण्याच्या हेतूने छत्रपतींना कमी लेखण्याचा प्रयत्न करण्यात आला असल्याचा आरोप शिवप्रेमींकडून करण्यात येत आहे. धीरेंद्र शास्त्री याच्या या संतापजनक वक्तव्याचा गोंदिया जिल्ह्यातील समस्त शिवप्रेमींकडून निषेध व्यक्त करण्यात येत आहे. आज, २६ एप्रिल रोजी शहरातील मनोहरचौक येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेसमोर संभाजी ब्रिगेड, मराठा सेवा संघ, ओबीसी संघर्ष कृती समिती, छत्रपती शिवाजी महाराज मराठा समिती, कुणबी समाज, सकल ओबीसी समाज आणि शिवप्रेमींच्या वतीने धीरेंद्र शास्त्री याच्या प्रतिमेला जोडे मारून निषेध व्यक्त करण्यात आला. यावेळी तत्काळ धीरेंद्र शास्त्री यांच्यावर गुन्हा दाखल करून कारवाईची मागणी करण्यात आली. त्याचप्रकारे कॉंग्रेस कमिटीच्या सभेत देखील निषेधाचा ठराव घेण्यात आला. दरम्यान जयस्तंभ चौकात धीरेंद्र शास्त्रीच्या छायाचित्राला काळे फासून जोडे मारो आंदोलन करण्यात आले.
ठिकठिकाणी पोलिसांत तक्रार...
स्वराज्य संस्थापक राजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल संतापजनक वक्तव्य करून संपूर्ण शिवप्रेमींचे मन दुखावणाऱ्या आणि छत्रपती शिवाजी महाराज यांना कमी लेखण्याचा प्रयत्न करणाऱ्या धीरेंद्र शास्त्री ऊर्फ बागेश्वर बाबा याच्यावर गुन्हा दाखल करण्यासंबंधाने गोंदिया शहर पोलिस ठाणे, सालेकसा, आमगाव, डुग्गीपार, अर्जुनी मोरगाव, तिरोडा आदी पोलिस ठाण्यांत तक्रार दाखल करण्यात आली.