शासनाच्या विविध योजनांचा लाभ घ्या

    दिनांक :26-Apr-2026
Total Views |
मंत्री डॉ. अशोक उईके यांचे आवाहन

राळेगाव, 
छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान समाधान शिबिराच्या माध्यमातून शासकीय योजना यांच्या माहितीसह महसूल विभागाच्या वतीने अडलेली शासकीय कामे त्वरित सोडवण्यासाठी, शासकीय योजनेत असणाऱ्या लाभार्थ्यांनी त्या योजनेचा लाभ घ्यावा, यासाठी माहिती दिली जाणार असून शासनाच्या विविध योजनांचा गरजूंना लाभ देण्यात यावा, असे प्रतिपादन आदिवासी विकास मंत्री Dr. Ashok Uike डॉ. अशोक उईके यांनी केले.
 
 

uike
 
तालुक्यातील वडकी येथे जिल्हा परिषद माध्यमिक शाळेच्या प्रांगणात आयोजित महाराजस्व समाधान शिबिरात ते बोलत होते. मान्यवरांच्या उपस्थितीत प्रतिमापूजनाने कार्यक्रमास प्रारंभ करण्यात आला. छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर अभियानाचे उद्घाटन मंत्री डॉ. अशोक उईके यांच्या हस्ते करण्यात आले. प्रमुख अतिथी उपविभागीय अधिकारी सुधीर पाटील, तहसीलदार अमित भोईटे, गटविकास अधिकारी केशव पवार, भाजपा जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. प्रफुल्ल चौहान, प्रवीण कोकाटे, संजय काकडे उपस्थित होते.
 
 
यावेळी उपविभागीय अधिकारी पाटील व तहसीलदार भोईटे यांनी या शिबिराचे महत्त्व सांगितले. यावेळी ग्रामीण भागातील सर्वसामान्य जनता, शेतकरी, विद्यार्थी, महिला यांना रहिवासी, उत्पन्न, जातीचे दाखले, रेशनकार्ड वाटप, सामाजिक लाभाच्या योजना, पीएम किसान योजना, फवारणी कीट, महसूल मंडळातील महसूल संबंधित प्रमाणपत्र वितरण व प्रकरणांची नोंद घेण्यात आली.
 
 
शिबिरासाठी मंडळ अधिकारी दिलीप चिडे व महादेव सानप, तलाठी निर्मला डोके यांच्यासह वडकी मंडळातील सर्व तलाठी व कोतवाल यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाला वडकी परिसरातील शेतकरी, बचतगट महिला व नागरिक उपस्थित होते. शिबिरात विविध शासकीय दाखले लाभार्थ्यांना वाटप करण्यात आले. शासकीय विभागातर्फे 20 च्यावर स्टॉल्स लावले होते. बचतगट महिलांनीही या शिबिरात वस्तूंचे स्टॉल्स लावले होते. यावेळी मंत्री Dr. Ashok Uike  डॉ. अशोक उईके यांनी भेट देऊन पाहणी केली व सर्वांशी संवाद साधला. शिबिरात लाभार्थ्यांना विविध दाखले मंत्री डॉ. उईके यांच्या हस्ते वाटप करण्यात आले.