उन्हाच्या काहिलीने होरपळले विद्यार्थी

    दिनांक :26-Apr-2026
Total Views |
वाढलेल्या तापमानात परीक्षा
 
अंजनगाव सुर्जी, 
Maharashtra State Examination Council महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे इयत्ता चौथी व सातवीच्या विद्यार्थ्यांकरिता उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा रविवार, २६ एप्रिल रोजी अंजनगाव सुर्जी परिसरात पार पडली. मात्र प्रचंड उन्हाच्या काहिलीमध्ये घेतलेल्या या परीक्षेमुळे विद्यार्थ्यांना मोठ्या गैरसोयींचा व अव्यस्थेचा सामना करीत परीक्षा द्यावी लागल्याने परीक्षा परिषदेच्या नियोजनावर पालकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. तालुक्यात एकूण १३ परीक्षा केंद्रांवर ही परीक्षा घेण्यात आली. शहरासह ग्रामीण भागातील इयत्ता चौथीचे ११०७ आणि इयत्ता सातवीचे ७१९ विद्यार्थी परीक्षेला बसले होते. दरम्यान, सुमारे ४५ अंश सेल्सिअस तापमानात परीक्षा झाल्याने अनेक विद्यार्थ्यांना उष्णतेचा फटका बसल्याचे चित्र पाहायला मिळाले. काही केंद्रांवर विद्यार्थ्यांची प्रकृती बिघडल्याने डॉक्टरांना पाचारण करण्याची वेळ आली. तर एका केंद्रावर विद्यार्थ्यांनी पिण्याच्या पाण्याची कोणतीही सोय नसल्याची तक्रार केली. भर उन्हात परीक्षा देताना पाणीही मिळाले नाही, अशी खंत विद्यार्थ्यांनी व्यक्त केली.
 
 


dksldsdsl
 
Maharashtra State Examination Council  काही परीक्षा केंद्रे टीनपत्र्यांच्या शाळांमध्ये असल्याने उष्णतेची तीव्रता अधिक जाणवत होती. परीक्षा संपवून बाहेर पडणारे विद्यार्थी जणू भट्टीतून बाहेर आल्यासारखे दिसत होते. दरम्यान, जिल्हाधिकार्‍यांनी उष्माघाताच्या पृष्ठभूमीवर शाळांच्या वेळा सकाळी ७ ते १० या कालावधीत ठेवण्याचे आदेश दिले असताना, परीक्षा मात्र दुपारच्या सत्रात घेण्यात आल्याने पालकांनी संताप व्यक्त केला. यावेळी बाहेर गावाहून परीक्षेस आलेल्या विद्यार्थ्यांच्या पाल्यांना शाळेबाहेरील परिसरात झाडा, झुडपांचा ईमारतींच्या सावलीचा आधार घेत वेळ काढावा लागला. याबाबत गटशिक्षणाधिकारी शीला आठवले यांनी सांगितले की, प्रत्येक परीक्षा केंद्रावर थंड पाण्याच्या कॅनची व्यवस्था करण्यात आली होती. ज्या ठिकाणी सुविधा उपलब्ध झाल्या नसतील, त्या केंद्रांची चौकशी केली जाईल.