मनिषा संत यांचे उद्बोधन
विदर्भस्तरीय परिसंवादाचा समारोप
अमरावती,
भारताच्या स्वातंत्र्याचा शताब्दी महोत्सव २१ वर्षाने आहे. भारतीय जीवनमूल्यांना प्रत्यक्ष कृतीची जोड देऊन आपल्याला संपूर्ण भारत विकसीत करायचा आहे. समाजाचा विचार करणार्या नारायणींची त्यात महत्त्वाची भूमिका राहणार आहे, असे उद्बोधन राष्ट्रसेविका समितीच्या अ. भा. शारीरिक प्रमुख Manisha Sant मनिषा संत यांनी केले.
राष्ट्रसेविका समिती विदर्भ प्रांत आणि नरसम्मा कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने ‘नारी से नारायणी - विकसित भारत २०४७ : महिलांची भूमिका व योगदान’ या विषयावर रविवारी आयोजित एक दिवसीय प्रांतीय परिसंवादाच्या समारोपप्रसंगी त्या बोलत होत्या. यावेळी विश्वमांगल्य सभेच्या सभाचार्या रेणूकामाई प्रामुख्याने तर अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. राजेश चंदनपाट होते. राष्ट्रसेविका समितीच्या प्रांत बौद्धीक प्रमुख आरती तिवारी यांचीही विचारमंचावर उपस्थिती होती.
मनिषा संत पुढे म्हणाल्या, स्त्री व पुरूष हे एकाच तत्त्वाचे दोन अंग आहे. हे दोनही अंग समानतेने कसे चालतील यावर आपल्याला काम करायाचे आहे. दोघांनी मिळून काम करण्याचा हा काळ आहे. तसेच महिलांना त्यांच्या आवडीचे काम करण्याचे स्वातंत्र्य दिल्यास विकसीत भारतासाठी ते उपयुक्त ठरणार आहे. रेणूकामाई आपल्या आशीर्वचनात म्हणाल्या, स्त्री ही शतरूपी आहे. ती वेगवेगळ्या रुपात समाजात कार्यरत आहे. भारताला विश्वगुरू पद प्राप्त करायचे असेल तर नारीला प्राधान्य देऊनच वाटचाल करावी लागणार आहे. तिची उपयोगीता विकसीत भारतासाठी मोलाची ठरणार असल्याचे त्यांनी सांगितले. वैयक्तीक गीत श्रावणी भडके यांनी सादर केले. संचालन यामीनी पांडे व उपस्थितांचे आभार राष्ट्रसेविका समितीच्या अमरावती नगर कार्यवाहीका गौरी लवाटे यांनी मानले.
Manisha Sant तत्पूर्वी कुटुंब ते राष्ट्रनिर्मिती, आधुनिक भारतातील महिला, समता ते सशक्तीकरण या विषयांवर चर्चासत्रे झाली. त्यानंतर विकसीत भारत २०४७ या विषयावर मुक्त संवाद झाला. राष्ट्रसेविका समितीच्या पश्चिम श्रेत्र बौद्धीक प्रमुख स्मिता पत्तरकीने, प्रज्ञा प्रवाह विदर्भ प्रांत प्रचार आयाम प्रमुख अंबरीश पुंडलिक, महिला समन्वय प्रांत संयोजिका मीरा कडबे यांनी त्यात सहभाग घेतला. या एक दिवसीय परिसंवादाला विदर्भातील प्रबुद्ध भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.