आ. सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केला निर्धार
पद्मापूर प्रवेशद्वाराचे लोकार्पण
चंद्रपूर,
ताडोबा हे निसर्गाचे वरदान असून, आगरझरी-मोहर्लीला पर्यावरणीय 'model village' ‘मॉडेल व्हिलेज’ म्हणून विकसित करण्यासाठी पुढाकार घेण्याचा निर्धार राज्याचे माजी वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केला आहे. पद्मापूर येथील ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या पद्मापूर प्रवेशद्वाराच्या सुशोभीकरणाचे उद्घाटन आ. मुनगंटीवार यांच्या हस्ते झाले. यावेळी ताडोबा पर्यटन विकास, रस्ते, सौंदर्यीकरण आणि स्थानिकांना रोजगारनिर्मिती यावर भर देत ताडोबाला आंतरराष्ट्रीय पर्यटन स्थळ म्हणून अधिक भक्कम स्थान मिळवून देण्याचा संकल्प त्यांनी व्यक्त केला. कार्यक्रमाला ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाचे क्षेत्र संचालक प्रभुनाथ शुक्ला, उपसंचालक कुशाग्र पाठक, उपसंचालक (कोर) आनंद रेड्डी, कार्यकारी अभियंता मुकेश टांगले, वनपरिक्षेत्र अधिकारी संतोष थिपे, उपकार्यकारी अभियंता विवेक अंबुले, शहर उपाध्यक्ष रामपाल सिंग आदींची उपस्थिती होती.
आगरझरी गावात रस्त्याच्या बाजूचे सौंदर्यीकरण करण्यासाठी 1 कोटी 85 लाख 62 हजार 847 रुपयांचे काम करण्यात आले. यामुळे जंगलातून प्रवास करताना पर्यटकांना झाडांवरील बिबट्या, विविध पक्षी, फुलपाखरे आणि निसर्गसौंदर्याचा आनंद घेता येणार आहे. आगरझरी गावाचे नाव देशभरातील पर्यटकांच्या ओठांवर राहील, अशा दर्जेदार पद्धतीने हे काम करण्यात आल्याचे मुनगंटीवार यांनी सांगितले. ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाचे क्षेत्रफळ सुमारे 1725 चौरस किलोमीटर असून, संजय गांधी नॅशनल पार्कचे क्षेत्रफळ 104 चौरस किलोमीटर आहे. नवीन ताडोबा विकसित करायचा असेल, तर महाराष्ट्राचे 23 वर्षांचे संपूर्ण बजेट खर्च करावे लागेल, असे सांगत ताडोबा ही आपल्याला निसर्गाने दिलेली अमूल्य संपत्ती आहे. 2014 नंतर येथे मोहर्ली गेट, गावांतील अंतर्गत रस्ते, बटरफ्लाय गार्डन यांसारखे अनेक विकास प्रकल्प राबविण्यात आले, याचाही आ. मुनगंटीवार यांनी उल्लेख केला. आज अनेकांच्या हाताला रोजगार मिळण्यामागे वाघ आणि ताडोबा हे प्रमुख कारण आहे. रिसॉर्ट, हॉटेल, जिप्सी आणि गाईड या क्षेत्रांमध्येही अधिक संधी निर्माण करण्याची आवश्यकता असल्याचे आ. मुनगंटीवार म्हणाले..
'model village' केंद्रीय वित्तमंत्री निर्मला सीतारामन तसेच केंद्रीय पर्यटन व सांस्कृतिक मंत्र्यांना ताडोबाचा 50 आंतरराष्ट्रीय पर्यटन स्थळांमध्ये समावेश करण्याची विनंती करण्यात आल्याची माहितीही त्यांनी दिली. ताडोबासाठी आणखी उत्तम नियोजन तयार करण्यात येणार असून, पर्यटकांच्या सोयी-सुविधांसोबतच या वनक्षेत्राचे संवर्धन करणार्या स्थानिक नागरिकांच्या सुविधाही वाढविण्यात येतील. ग्रामपंचायतीचे सरपंच, सदस्य आणि सर्व लोकप्रतिनिधींसोबत कार्यशाळा घेऊन पुढील विकास आराखडा तयार केला जाईल, असेही मुनगंटीवार यांनी सांगितले.