नवी दिल्ली,
monsoon-2026 : एप्रिल महिन्यातील प्रचंड उष्णतेने हैराण झालेल्या नागरिकांसाठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. मध्यम-श्रेणी हवामान अंदाजासाठी युरोपीय केंद्र (ईसीएमडब्ल्यूएफ) च्या नव्या अंदाजानुसार, यंदाचा मान्सून मागील वर्षाप्रमाणेच मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात भारतात दाखल होण्याची शक्यता आहे.
या अंदाजानुसार, मान्सून सर्वप्रथम अंदमान-निकोबार बेटांवर १८ ते २५ मे दरम्यान पोहोचू शकतो. त्यानंतर २५ मे ते १ जूनदरम्यान केरळ आणि तामिळनाडूच्या दक्षिण भागात पावसाची सुरुवात होईल. या काळात काही भागांत ३० ते ६० मिमीपेक्षा जास्त पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
सध्या देशातील अनेक भागांमध्ये तापमान ४० ते ४४ अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचले असून, उत्तर, मध्य आणि पूर्व भारत उष्णतेच्या लाटेत सापडला आहे. यामुळे नागरिकांसह शेतकरीही चिंतेत होते. अल निनोमुळे यंदा मान्सून उशिरा येईल, अशी भीती व्यक्त केली जात होती. मात्र तज्ज्ञांच्या मते, यंदा मान्सून वेळेआधी किंवा वेळेतच येण्याची शक्यता आहे आणि अल निनोचा मोठा परिणाम होणार नाही.
हवामान तज्ज्ञांच्या मते, सध्या बंगालच्या उपसागर आणि अंदमान समुद्रातून येणारे वारे आर्द्रता घेऊन येत आहेत, ज्यामुळे पावसासाठी अनुकूल परिस्थिती तयार होत आहे. तसेच या भागात चक्रीवादळ तयार होण्याची शक्यता असून, त्यामुळे मान्सूनला गती मिळू शकते.
याशिवाय इंडियन ओशन डायपोल (आयओडी) सुद्धा मान्सूनसाठी अनुकूल असल्याचे सांगितले जात आहे. सध्या वाढलेली उष्णता आणि तापलेली जमीनही पावसासाठी पोषक वातावरण तयार करत आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांत उष्णतेचा कडाका कायम राहील, पण त्यानंतर मान्सूनमुळे दिलासा मिळण्याची शक्यता आहे.