मिरवणुकीत पूल कोसळला; आठ जखमी! VIDEO

    दिनांक :26-Apr-2026
Total Views |
मंगळुरू,
bridge-collapses : मंगळुरू जवळील दक्षिण कन्नड जिल्ह्यातील मूडबिद्री तालुक्यात एक जुना आणि अरुंद पादचारी पूल अचानक कोसळल्याने मोठी दुर्घटना घडली. या घटनेत धार्मिक मिरवणुकीत सहभागी असलेल्या आठ जणांना दुखापत झाली. ही घटना होसाबेट्टूजवळील बावदाबैले परिसरात घडली.
 
POOL COLLLAPS
 
 
मिळालेल्या माहितीनुसार, भाविक धर्मविधीसाठी नैवेद्य आणि पालखी घेऊन मिरवणूक काढत होते. मिरवणुकीत सुमारे पंचवीस जण सहभागी होते. पारंपरिक वाद्यांच्या गजरात सर्वजण पूल ओलांडत असताना मधोमध पोहोचताच पूल अचानक कोसळला. अतिभारामुळे पुलाचा आधार कमकुवत झाला आणि तो तुटल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे.
पूल कोसळताच पालखी आणि अनेक भाविक सुमारे दहा फूट खोल दरीत पडले. या घटनेनंतर परिसरात एकच गोंधळ उडाला. स्थानिक नागरिकांनी तात्काळ धाव घेऊन जखमींना बाहेर काढले आणि मदतकार्य सुरू केले. या अपघातात हरीश नावाच्या व्यक्तीचे दोन्ही पाय मोडले असून मरूर येथील सुनील शेट्टी गंभीर जखमी झाले आहेत. इतर सहा जणांना किरकोळ दुखापत झाली आहे. सर्व जखमींना उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
 
 
 
पोलिसांच्या माहितीनुसार, हा पूल सुमारे पन्नास वर्षे जुना होता आणि त्याची अवस्था खूपच जीर्ण झाली होती. या घटनेनंतर प्रशासनाने पुलांच्या सुरक्षिततेबाबत चौकशी सुरू केली असून, अशा जुन्या पुलांची वेळोवेळी तपासणी करण्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे.