गादेगावामध्ये जैविक शेतीची नवी क्रांती!

    दिनांक :26-Apr-2026
Total Views |
१५ ते २० शेतकर्‍यांचा अमृत पॅटर्नकडे कल
 
मानोरा, 
तालुक्यातील गादेगाव येथील १५ ते २० शेतकर्‍यांनी पारंपरिक रासायनिक शेतीला रामराम ठोकत Organic farming जैविक शेतीकडे वळण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. सतत रासायनिक खतांचा वापर केल्यामुळे जमिनीची पोत खालावला असून, उत्पादनात घट होत असल्याचा अनुभव घेतल्यानंतर शेतकर्‍यांनी हा बदल स्वीकारला आहे. गेल्या काही वर्षांत रासायनिक शेतीमुळे जमिनीची सुपीकता कमी झाली. खर्च वाढला आणि उत्पन्न अपेक्षेप्रमाणे मिळेनासे झाले. त्यामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत सापडत होते. या पार्श्वभूमीवर गादेगावातील शेतकर्‍यांनी एकत्र येत जैविक शेतीचा संकल्प केला आहे.
 
 
Organic farming
(संग्रहित छायाचित्र ) 
 
Organic farming  या उपक्रमांतर्गत शेतकरी एक ट्रॉली शेणखतात अझोटोबॅक्टर ४ किलो, पीएसबी ४ किलो, ट्रायकोडर्मा ४ किलो आणि रायझोबियम ४ किलो यांचे मिश्रण करून त्यावर पाणी टाकून अमृत पॅटर्ननुसार कंपोस्ट खत तयार करीत आहेत. या पद्धतीने तयार केलेले खत जमिनीची सुपीकता वाढविण्यास, पिकांची वाढ करण्यास मदत करते आणि उत्पादन क्षमता वाढविण्यास मदत करणार आहे. या प्रयोगात सहभागी झालेले शेतकरी घनश्याम विष्णुदास आडे, अजय विष्णू चौरे, दिलीप बळीराम चौरे, रमाकांत डुलाजी गावंडे, संदीप साहेबराव ढोक, पांडुरंग काशीराम वाकोडे, किरण रामनाथ आडे, हरीश खडकीकर, राहुल विजय चौरे आणि दिलीप भोपाजी गावंडे यांनी आपल्या शेतात तीन ते चार ट्रॉली शेणखतावर प्रक्रिया करून जैविक शेतीचा मार्ग स्वीकारला आहे. शेतकर्‍यांच्या या उपक्रमामुळे परिसरातील इतर शेतकर्‍यांनाही प्रेरणा मिळत असून, कमी खर्चात अधिक उत्पादन मिळविण्याचा मार्ग खुला झाला आहे. जैविक शेतीमुळे केवळ उत्पादन वाढणार नाही, तर जमिनीचे आरोग्य सुधारेल आणि पर्यावरणालाही मोठा फायदा होणार आहे.

शेणखतावर जैविक प्रक्रिया केल्यामुळे शेणखतामध्ये अधिक गुणधर्म आढळून आले. त्यामुळे शेतकर्‍यांना जैविक प्रक्रिया करून कमी खर्चामध्ये अधिक फायदा घेता येईल.
तालुका कृषी अधिकारी आर. एस. भागवत