आमचे प्राधान्य उद्योग येणे, नंतर मालधक्का

    दिनांक :26-Apr-2026
Total Views |
माजी मंत्री शोभाताई फडणवीस यांचे स्पष्टीकरण

चंद्रपूर, 
मूल परिसरात मोठ्या संख्येत वाघ व वन्यप्राण्यांचा धोका आहे. रोजगारासाठी त्यांना जंगलावर अवलंबून राहावे लागते आणि जंगलात गेले तर मृत्यूशी झुंजावे लागते. अशावेळी येथील ग्रामस्थांना शहरातच रोजगार मिळावा, त्यासाठी येथे उद्योग यावे हा आमचा प्राधान्याचा मुद्दा आहे. त्याला पूरक म्हणून मालधक्का होणेही गरजेचे आहे. शिवाय, या मालधक्क्याने मूल शहरात कुठलेही प्रदुषण होणार नाही, असा दावा माजी मंत्री Shobhatai Fadnavis शोभाताई फडणवीस यांनी मूल येथे आयोजित पत्रपरिषदेत केला.
 
 
Shobhatai Fadnavis
 
त्या म्हणाल्या, मूल परिसरात कायमस्वरूपी आर्थिक व्यवस्था करणे गरजेचे आहे. त्याकरीता जनतेचा सहभाग असावा, याकरीता ग्रामस्थांच्या स्वाक्षर्‍यांची मोहीम आम्ही सुरु केली. अवघ्या दहा दिवसात 25 हजार स्वाक्षर्‍या गोळा केल्या, त्यात मूल शहरातील 1 हजार 550 नागरिकांचा प्रतिसाद मिळाला. ग्रामस्थही मोठ्या संख्येत पुढे आले. आम्ही कारखाने आणतो म्हटले तर शेतकर्‍यांनी जमिनी देण्याची हमी दिली. पाहता-पाहता 700 ते 800 एकर जमिनीचे आश्‍वासन मिळाले आहे. कुणाचे फायदे, कुणाचे नुकसान हा माझा विषय नाही, तर जनतेला काय हवे आहे हा माझा विषय आहे, असे स्पष्टीकरण फडणवीस यांनी दिले.
 
 
मूल येथे होणार मालधक्का येथील कामगारांसाठी मजुरांसाठी, येथे येणार्‍या उद्योगांच्या दृष्टीने महत्वाचा आहे. पुढे लवकरच उद्योजकांसाठी कॅरिडोर होणार आहे. त्याचा मार्ग वेगळा आहे. तो नवेगाव मोरे, पोंभुर्णा, आक्सापूर, राजुरा, चंद्रपूर, घुग्घूस, भद्रावती, वरोडा, जाम, वर्धा, सेलहोह, नागपूर, मुंबई समृध्दी मार्ग याप्रमाणे असेल, अशीही माहिती फडणवीस यांनी दिली.
 
मालधक्क्याने मूलमध्ये प्रदुषण शक्य नाही
सुरजागड खदाणीच्या सर्व गाडया लोहखनिज घेऊन या चामोर्शी, चांदापूर फाटा, चांदली, ताडाळा, चिचाळा, कवडपेठ, चिरोली येथून केळझर येथील मालधक्क्यावर येतात. तसाच मालधक्का मूल रेल्वे स्थानकानजीक होणार आहे. मूलला मालधक्का झाल्यास सर्व खदानीच्या, कारखान्याच्या गाडया या केळझरवरुन सरळ रेल्वे स्थानकावर येईल, मूल शहरातून गाड्या जाणार नाही. त्यामुळे प्रदुषण होण्याचा प्रश्‍नच नाही, असा दावाही Shobhatai Fadnavis  शोभाताई फडणवीस यांनी केला.