जनजागृती रॅलीला उत्स्फूर्त प्रतिसाद
यवतमाळ,
'World Winter Fever Day' हिवताप (मलेरिया) आजाराचे निर्मूलन करण्यासाठी आणि नागरिकांमध्ये प्रतिबंधात्मक उपायांबाबत जागृती निर्माण करण्यासाठी, जिल्हा हिवताप विभाग यवतमाळच्या वतीने शनिवार, 25 एप्रिल रोजी ‘जागतिक हिवताप दिन’ उत्साहात साजरा करण्यात आला. जिल्हा स्त्री रुग्णालय प्रांगणात आयोजित या कार्यक्रमात विविध आरोग्य उपक्रम राबवून हिवतापमुक्त जिल्ह्याचा संकल्प करण्यात आला.
'World Winter Fever Day' कार्यक्रमाचे उद्घाटन आणि प्रतिमा पूजन कार्यक्रमाचे उद्घाटक जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुभाष ढोले यांच्या अध्यक्षतेत आणि जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुखदेव राठोड यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले. जिल्हा हिवताप अधिकारी डॉ. शेख यांच्या नेतृत्वात व मार्गदर्शनात संपूर्ण कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले. मान्यवरांच्या हस्ते डॉ. रोनाल्ड रॉस यांच्या प्रतिमेचे पूजन व दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची रीतसर सुरुवात झाली. या आयोजनासाठी सहायक जिल्हा हिवताप अधिकारी रेशमा शेंगर, अश्विनी हांडे, रितेश भगत, संजय डांगे, अनिल परचाके यांनी विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आरोग्य निरीक्षक धीरज पिसे यांनी केले. याप्रसंगी हिवताप कार्यालयातील सर्व कर्मचारी आणि कीटकसमारक, तसेच आरोग्य कर्मचारी उपस्थित होते. केवळ प्रचारच नव्हे तर प्रत्यक्ष कृतीवरही भर देण्यात आला. या मोहिमेअंतर्गत शहरात व जिल्ह्यात साचलेल्या पाण्यामध्ये गप्पी मासे सोडणे आणि टेमिफॉसची अॅक्टिव्हिटी करण्याची कारवाई आरोग्य पथकांमार्फत करण्यात आली. यामुळे डासांच्या उत्पत्तीला आळा बसण्यास मदत होणार आहे.
जनजागरण रॅली आणि भिंतीपत्रके
या दिनानिमित्त संपूर्ण यवतमाळ शहरामध्ये जनजागरण रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. या रॅलीमध्ये नर्सिंग कॉलेजच्या प्रशिक्षणार्थी विद्यार्थिनींनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन नागरिकांचे लक्ष वेधून घेतले. आरोग्य विभागातर्फे जिल्ह्यात ठिकठिकाणी पोस्टर, भिंतीपत्रके आणि दर्शनी भागात हिवताप प्रतिबंधक म्हणी लिहून प्रभावी प्रसिद्धी करण्यात आली.
आरोग्य विभागाचे आवाहन
हिवताप हा डासांमुळे होणारा आजार असून, नागरिकांनी आपल्या घराभोवती पाणी साचू देऊ नये, दर रविवारी ‘कोरडा दिवस’ पाळावा आणि तापाची लक्षणे दिसताच जवळच्या शासकीय रुग्णालयात तपासणी करून घ्यावी, असे आवाहन यावेळी डॉ. सुभाष ढोले, डॉ. सुखदेव राठोड, डॉ. तनवीर शेख, तसेच आरोग्य प्रशासनातर्फे करण्यात आले.