मुंबई,
Agricultural centers on strike राज्यातील कृषी क्षेत्राशी संबंधित मोठा निर्णय समोर आला असून खते आणि बियाणे विक्री करणाऱ्या तब्बल ८५ हजार कृषी सेवा केंद्रांनी आजपासून बेमुदत बंद पुकारला आहे. या अचानक घेतलेल्या निर्णयामुळे शेतकऱ्यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे, कारण खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर पेरणीपूर्व तयारी सुरू असतानाच हा संप सुरू झाला आहे.हा निर्णय कृषी सेवा केंद्र चालकांच्या संघटनेने घेतला असून केंद्र आणि राज्य सरकारच्या धोरणांविरोधात तसेच विविध प्रलंबित मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात आले आहे. राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये या आंदोलनाला मोठा प्रतिसाद मिळाला असून देशातील इतर राज्यांतील कृषी केंद्र चालकांनीही या बंदला पाठिंबा दिल्याची माहिती समोर आली आहे.

संघटनेच्या मते, अनधिकृत बियाण्यांच्या विक्रीवर नियंत्रण ठेवण्याच्या नावाखाली होत असलेल्या काही उपाययोजनांमुळे अधिकृत विक्रेत्यांवर अन्याय होत आहे. खत कंपन्यांकडून सक्तीची विक्री पद्धत लागू केली जात असल्याचा आरोपही करण्यात आला आहे. तसेच थेट शेतकऱ्यांना एजंटमार्फत बियाणे आणि कीटकनाशकांची होणारी अवैध विक्री थांबवावी, अशी मागणीही पुढे आली आहे.बियाणे विक्रीसाठी लागू करण्यात आलेल्या डिजिटल प्रणालीला देखील विरोध दर्शवण्यात आला असून त्यामुळे लहान विक्रेत्यांवर अतिरिक्त ताण येत असल्याचे सांगण्यात आले आहे. अनेक नियम आणि अटी जाचक असून व्यवसाय करणे कठीण झाल्याचे कृषी केंद्र चालकांचे म्हणणे आहे.
दरम्यान, कीटकनाशक कंपन्यांकडून कालबाह्य झालेला माल परत न घेतल्याबाबतही नाराजी व्यक्त करण्यात आली आहे. या सर्व मागण्यांवर सरकारने तातडीने निर्णय घ्यावा, अन्यथा आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा देण्यात आला आहे. या बंदमुळे शेतकऱ्यांना मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. सध्या खरीप हंगामासाठी शेतकरी खते आणि बियाण्यांची खरेदी करत असून अशा महत्त्वाच्या काळातच पुरवठा थांबल्याने अडचणी वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे. सरकार आणि संघटना यांच्यातील चर्चेतून काय तोडगा निघतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.