वॉशिंग्टन,
America's new formula under discussion अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणसोबतच्या शांतता चर्चेच्या प्रक्रियेत पाकिस्तानचा समावेश न करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे आंतरराष्ट्रीय राजकारणात नवा तणाव निर्माण झाला आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, पुढील काळात कोणतीही चर्चा पाकिस्तानमध्ये होणार नाही आणि वाटाघाटींसाठी इतका दीर्घ प्रवास करण्याची गरज उरणार नाही. एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी स्पष्ट केले की, इराणशी संवाद साधायचा असल्यास तो फोनद्वारे किंवा थेट वॉशिंग्टनमध्ये येऊनच होऊ शकतो. त्यांच्या मते, केवळ चर्चेसाठी १८ तासांचा विमानप्रवास करून वाटाघाटी करण्याचा पर्याय आता स्वीकारला जाणार नाही. तसेच त्यांनी असेही म्हटले की महत्त्वाच्या अटी इराणला आधीच ठाऊक आहेत आणि अण्वस्त्रांबाबत कोणतीही तडजोड केली जाणार नाही.
ट्रम्प यांनी पुढे असेही नमूद केले की हा निर्णय संघर्ष पुन्हा सुरू होण्याचे संकेत नाहीत, तर अमेरिकेची भूमिका अधिक ठाम झाल्याचे द्योतक आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, सध्याच्या परिस्थितीत अनेक गोष्टी अमेरिकेच्या नियंत्रणात आहेत आणि इराणकडे प्रभावी नेतृत्व उरलेले नाही, असेही त्यांनी सूचक वक्तव्य केले. दरम्यान, इराणचे परराष्ट्र मंत्री अब्बास अराघची हे रशियातील सेंट पीटर्सबर्ग येथे दाखल झाले असून ते रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांची भेट घेणार आहेत. या भेटीत प्रादेशिक परिस्थिती आणि आंतरराष्ट्रीय तणावावर चर्चा होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.