मुंबई,
Catch monkeys and earn महाराष्ट्रात माकडांच्या वाढत्या उपद्रवामुळे आणि शेती तसेच मानवी वस्तीला होत असलेल्या त्रासामुळे राज्य सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. माकडांना पकडून वनविभागाकडे सुपूर्द करणाऱ्या बचाव पथकांना यापुढे मिळणारी भरपाई वाढवण्यात आली असून ती ३०० रुपयांवरून थेट ६०० रुपये करण्यात आली आहे. कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातील अनेक भागांमध्ये माकडांनी धुमाकूळ घातल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत असल्याच्या तक्रारी वाढत होत्या. पिकांचे नुकसान, घरांमध्ये घुसखोरी आणि साठवलेल्या अन्नधान्याची नासाडी अशा घटना वारंवार घडत असल्याने स्थानिक पातळीवर चिंता व्यक्त केली जात होती. या पार्श्वभूमीवर सरकारने हा निर्णय घेतला असून मानव आणि वन्यजीव यांच्यातील संघर्ष कमी करण्याचा उद्देश असल्याचे सांगितले जात आहे.
छायाचित्र आणि चित्रफिती आवश्यक
या योजनेअंतर्गत माकडांना पकडताना कोणतीही इजा होणार नाही याची काळजी घेणे बंधनकारक असेल. सापळे आणि पिंजऱ्यांचा वापर करून माकडांना सुरक्षितपणे पकडून त्यांना वस्तीपासून दूर घनदाट जंगलात सोडणे आवश्यक असेल. संबंधित ठिकाणावर किमान दहा किलोमीटर अंतरावर सोडल्यासच भरपाई मिळणार आहे. यासाठी छायाचित्र आणि चित्रफिती स्वरूपात पुरावे सादर करणे बंधनकारक असेल, तसेच वनविभागाच्या अधिकाऱ्यांची उपस्थितीही आवश्यक राहणार आहे. दरम्यान, एका मोहिमेसाठी खर्चाची मर्यादाही ठरवण्यात आली असून जास्तीत जास्त दहा हजार रुपये खर्च करता येणार आहे. माकड पकडताना कोणत्याही प्रकारची जखम झाल्यास किंवा अपघात झाल्यास संबंधित पथकाला जबाबदार धरले जाणार असल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे. या निर्णयामुळे माकडांच्या वाढत्या त्रासावर नियंत्रण मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे, मात्र प्रत्यक्षात ही योजना किती प्रभावी ठरते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.