21 जनावरांची सुटका
24.25 लाखाचा मुद्देमाल जप्त
चंद्रपूर,
Cattle smugglers arrested गोवंशांना निदर्यतेने वाहनात कोंबून वाहतूक करणार्या दोन आरोपींना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली आहे. या कारवाईत 21 गोवंशांची या तस्करांच्या तावडीतून सुटका करण्यात आली. एकूण 24 लाख 25 हजार रुपये किंमतीचा मुद्देमालही जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई रविवारी पहाटे 5 वाजताच्या सुमारास येथील रामाळा बगिचा जवळील रेल्वे फाटकाजवळ करण्यात आली.
गोवंशाची कत्तल करण्याच्या उद्देशाने दोन पिकअप वाहनातून बगडखिडकी परिसरातून वाहतूक केली जात असल्याचे माहिती स्थानिक गुन्हे शाखेला मिळाली. या माहितीच्या आधारे पथकाने रामाळा बगिचाजवळील रेल्वे फाटकजवळ सापळा रचला. त्यावेळी तेथे आलेल्या दोन पिकअप वाहनांना अडवून पाहणी केली असता, त्यात 14 गायी आणि 7 बैल असे एकूण 21 गोवंश निर्दयपणे कोंबलेले आढळले. या गोवंशासाठी चारा किंवा पाण्याची कुठलीही सोय नव्हती. वाहन चालकाकडे प्राण्यांच्या वाहतुकीचा कोणताही परवाना किंवा पशुवैद्यकीय दाखला नव्हता. हे गोवंशांना गडचिरोली जिल्ह्यातील कोरची येथून गढ़पूर येथे कत्तलीसाठी नेले जात असल्याचे निष्पन्न झाले.
Cattle smugglers arrested 20 लाख रुपये किंमतीचे दोन पिकअप वाहन, 3 लाख 80 हजार रुपये किंमतीचे 21 गोवंश, 48 हजार रुपये किंमतीचे तीन भ्रमणध्वनी असा एकूण 24 लाख 25 हजार रुपये किंमीचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला. याप्रकरणी आरोपी संतोष रामभाऊ थोरात (52, रा. अष्टभुजा वॉर्ड, चंद्रपूर), ऐजाज असलम बेग (38), वसिम नबी कुरेशी (38, रा. बगळ खिडकी वॉर्ड, चंद्रपूर) यांच्याविरूध्द रामनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सुटका केलेल्या सर्व गोवंशांना सुरक्षिततेसाठी येथील ‘प्यार फाऊंडेशन’ येथे वैद्यकीय तपासणीसाठी दाखल करण्यात आले आहे. ही कारवाई पोलिस निरीक्षक अमोल काचोरे यांच्या नेतृत्वात पोलिस उप निरीक्षक विनोद भुरले व सुनील गौरकार, हवालदार सुभाष गोहोकार, सतिश अवथरे, रजनिकांत पुठ्ठावार, दीपक डोंगरे, इम्रान खान आदींनी केली.