नागरिकांनी स्व-गणनेत सहभाग घ्यावा

    दिनांक :27-Apr-2026
Total Views |
प्रभारी जिल्हाधिकारी संजय तेली यांचे पत्रपरिषदेत आवाहन
जनगणनेची तयारी पूर्ण
 
वर्धा, 
Census preparations complete जनगणना हे राष्ट्रीय स्तरावरील महत्त्वाचे कार्य असून देशाच्या सर्वांगीण विकास आणि नियोजनासाठी संकलित माहिती महत्त्वाची ठरते. जनगणनाचा कार्यक्रम जाहीर झाला असून देशातील ही पहिलीच डिजिटल जनगणना आहे. या जनगणनेसाठी अधिकारी, कर्मचार्‍यांची नियुती केली आहे. मात्र, डिजिटल गणना असल्याने नागरिकांनीही पोर्टलच्या सहाय्याने स्वत:च्या मोबाईलद्बारे स्व-गणनेत सहभाग घ्यावा, असे आवाहन प्रभारी जिल्हाधिकारी संजय तेली यांनी आज सोमवार २७ रोजी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात आयोजित पत्रपरिषदेत केले.
 
 
Census
 
जिल्हाधिकारी संजय तेली पुढे म्हणाले की, जनगणनेची तयारी पूर्ण झाली आहे. ही जनगणना दोन टप्प्यात होणार असून पहिल्या टप्प्यात घरयादी व गणना तर दुसर्‍या टप्प्यात लोकसंख्या गणना केली जाणार आहे. पहिला टप्पा १६ मे ते १४ जून २०२६ या कालावधीत प्रगणक घरभेटी देऊन माहिती संकलित करतील. पहिला टप्पा सुरू होण्यापूर्वी १ ते १५ मे या कालावधीत स्व-गणना घेण्यात येणार आहे. जिल्हास्तरावर जनगणना नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आले असल्याचे त्यांनी सांगितले.
 
 
Census preparations complete  नगरपरिषद व नगरपंचायत क्षेत्रात चार्ज अधिकारी म्हणून संबंधित नप मुख्याधिकारी कार्य करतील. याकरिता १० अधिकार्‍यांची नियुती करण्यात आली आहे. ग्रामीण क्षेत्राकरिता ८ तहसिलदार, जिल्हास्तरीय लिपीक २०, क्षेत्रीय प्रशिक्षक (फिल्ड ट्रेनर) ४२, प्रगणक २२०२, पर्यवेक्षक ३६८, तांत्रिक सहाय्य २० तर मास्टर ट्रेनर म्हणून २ अधिकार्‍यांची नियुती करण्यात आली आहे. मास्टर्स ट्रेनर्स, फिल्ड ट्रेनर्स, पर्यवेक्षकाचे प्रशिक्षण पूर्ण झाले असून प्रगणकांचे प्रशिक्षण ८ मे पर्यंत पूर्ण होईल, अशी माहितीही जिल्हाधिकारी तेली यांनी यावेळी दिली. १ ते १५ मे दरम्यान स्व-गणनेला सुरूवात होणार असून डिजिटल असल्याने नागरिकांना प्रथमच गणनेत सहभागी होता येणार आहे. स्वत:च्या मोबाईलमध्ये अ‍ॅप सुरू करून पोर्टलवर ३३ प्रश्नांची साधी-सोपी माहिती भरावयाची आहे. त्यामुळे या जनगणनेत नागरिकांनी सहभाग घ्यावा, असे आवाहन प्रभारी जिल्हाधिकारी संजय तेली यांनी यावेळी केले. पत्रकार परिषदेला निवासी उपजिल्हाधिकारी संजीव जाधवर उपस्थित होते.