नवी दिल्ली,
Heatwave in Maharashtra राज्यात सध्या उष्णतेच्या लाटेचा तीव्र परिणाम जाणवत असून अनेक भागांत तापमानाने धोकादायक पातळी गाठली आहे. दिवसेंदिवस वाढणाऱ्या उन्हामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून रस्ते, बाजारपेठा आणि सार्वजनिक ठिकाणी दुपारच्या वेळी शुकशुकाट दिसून येत आहे. विदर्भातील अकोला येथे तापमानाने तब्बल ४६.९ अंश सेल्सिअस इतका उच्चांक गाठला आहे. या हंगामातील ही सर्वाधिक नोंद मानली जात असून अकोला आता जगातील सर्वाधिक उष्ण शहरांच्या यादीत वरच्या क्रमांकावर पोहोचल्याची माहिती समोर आली आहे. सतत वाढणाऱ्या तापमानामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत.
दुसरीकडे, उपराजधानी नागपूरमध्येही उष्णतेचा कहर सुरू असून येथे उष्माघातामुळे एका वृद्धाचा मृत्यू झाल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. बसने प्रवास करत असलेल्या ७५ वर्षीय प्रवाशाला बसस्थानक परिसरात अचानक अस्वस्थ वाटू लागले आणि तो बेशुद्ध पडला. रुग्णालयात दाखल केल्यानंतर त्याचा मृत्यू झाला असून डॉक्टरांनी प्राथमिक अंदाजात उष्माघात हे कारण असू शकते असे सांगितले आहे.लातूर जिल्ह्यातही परिस्थिती गंभीर असून उष्माघातामुळे आणखी एका तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. औसा तालुक्यातील एरंडी गावातील २५ वर्षीय तरुण शेतातील काम करून घरी परतल्यानंतर अचानक कोसळला आणि त्याचा मृत्यू झाला. यापूर्वीही या जिल्ह्यात उष्णतेमुळे काही जीवितहानी झाल्याच्या घटना घडल्या आहेत.
राज्यातील अनेक भागांमध्ये वाढत्या तापमानामुळे नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. विशेषतः शेतकरी, कामगार आणि बाहेर फिरणाऱ्या नागरिकांवर याचा सर्वाधिक परिणाम दिसत आहे. उष्णतेपासून बचाव करण्यासाठी लोक विविध उपायांचा अवलंब करत आहेत.दरम्यान, हिंगोली जिल्ह्यातील गोजेगाव येथे एका विवाह सोहळ्यात उष्णतेपासून दिलासा देण्यासाठी अनोखी व्यवस्था करण्यात आली होती. मंडप परिसरात पाण्याचे फवारे बसवून वातावरण थंड ठेवण्याचा प्रयत्न करण्यात आला, ज्यामुळे उपस्थितांना मोठा दिलासा मिळाला. वाढत्या उष्णतेच्या पार्श्वभूमीवर अशा उपायांची गरज अधोरेखित होत असल्याचे चित्र दिसत आहे.