मोरादाबाद,
hindu-sanatani-society : उत्तर प्रदेशातील मोरादाबाद जिल्ह्यातील एका वस्तीत लावलेले पोस्टर्स सध्या चर्चेत आहेत. हे प्रकरण काठघर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील लाजपत नगर येथील श्री राम सोसायटीशी संबंधित आहे. तेथील काही घरांबाहेर पोस्टर्स लावण्यात आले असून, हिंदूंशिवाय इतरांना घरे विकू नयेत असे आवाहन करण्यात आले आहे.
पोस्टर्सवर स्पष्टपणे लिहिले आहे, "संपूर्णपणे हिंदू सनातनी सोसायटी. हा परिसर केवळ हिंदू समाजाच्या निवासस्थानासाठी आहे. कृपया येथे घरे खरेदी करू नका. येथील मंदिरात वेळोवेळी धार्मिक कार्यक्रम आणि विधी आयोजित केले जातात. त्यामुळे, परिसरातील सर्व प्रतिष्ठित रहिवाशांनी या परिसराच्या धार्मिक आणि सांस्कृतिक मूल्यांचा आदर करावा."
माध्यमांच्या वृत्तानुसार, या वस्तीत अंदाजे ४० कुटुंबे राहतात आणि त्यापैकी सुमारे दोन डझन कुटुंबांनी आपल्या घराबाहेर असे पोस्टर्स लावले आहेत. स्थानिक रहिवाशांचे म्हणणे आहे की, काही कुटुंबे आपली घरे विकू पाहत आहेत आणि त्यामुळे, ही घरे केवळ हिंदू कुटुंबांनाच दिली जावीत, अशी त्यांची इच्छा आहे.
परिसराचे संवेदनशीलतेचे कारण लक्षात घेता, पोलीस अधीक्षक (शहर) कुमार रणविजय सिंह यांच्या निर्देशानुसार काठघर पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी रहिवाशांशी संवाद साधला. मात्र, अद्याप कोणत्याही पक्षाकडून लेखी तक्रार दाखल करण्यात आलेली नाही, असे पोलिसांचे म्हणणे आहे.