शहरात आजही माेठ्या प्रमाणात अवैध हाेर्डिंग्स

    दिनांक :27-Apr-2026
Total Views |
- मनपा कारवाई का करीत नाहीत : उच्च न्यायालयाचे ताशेरे

अनिल कांबळे
नागपूर, 
Illegal hoardings शहरातील सार्वजनिक ठिकाणी अवैध हाेर्डिंग्जच्या मुद्द्यावरून मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने नागपूर महानगरपालिकेच्या (मनपा) कारभारावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. वारंवार निर्देश देऊनही ठाेस कारवाई का हाेत नाही, अशी विचारणा करत न्यायालयाने मनपा आयुक्तांना याप्रकरणी प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे आदेश दिले आहेत.
 
 
mnpa
 
Illegal hoardings  दिनेश नायडू यांनी दाखल केलेल्या अवमान याचिकेवर साेमवारी न्या. अनिल किलाेर आणि न्या. राज वाकाेडे यांच्या खंडपीठासमाेर सुनावणी झाली. न्यायालयाने निरीक्षण नाेंदवले की, कडक कारवाईचे आदेश असूनही शहरात आजही अनेक ठिकाणी छाेटे-माेठे अवैध हाेर्डिंग्ज दिसत आहेत. मनपा अधिकारी याकडे डाेळेझाक करत असून प्रशासनाची मिळमिळत भूमिका याेग्य नसल्याचे न्यायालयाने म्हटले आहे. याप्रकरणी याचिकाकर्त्याच्या वतीने अ‍ॅड. तुषार मंडलेकर यांनी बाजू मांडली. प्रकरणाची पुढील सुनावणी 30 एप्रिल राेजी निश्चित करण्यात आली आहे.
 

नाेटिस बजावून स्पष्टीकरण रेकाॅर्डवर घ्या
वाढत्या समस्येवर कायमस्वरूपी उपाय म्हणून मनपा नवीन धाेरण लागू करणार आहे का, याची माहिती गत सुनावणीदरम्यान उच्च न्यायालयाने मागवली हाेती. महत्त्वाचे म्हणजे प्रकरण निकाली निघाल्यानंतर ही कारवाई इतर जिल्ह्यांतही राबवली जाईल, असे न्यायालयाने स्पष्ट केले हाेते. महत्त्वचे म्हणजे शहरात एका व्यक्तीने किती हाेर्डिंग लावले, त्याच्या हिशेबासह दंडाचा लेखाजाेखा उच्च न्यायालयाने मागवला आहे.