मयूरभंज,
kindergarten ओडिशातील मयूरभंज जिल्ह्यातील धीरकुला गावातून एक हृदयस्पर्शी घटना समोर आली असून, एका भटक्या कुत्रीने दाखवलेल्या अतुलनीय शौर्याने संपूर्ण परिसर भारावून गेला आहे. ‘काली’ नावाच्या या कुत्रीने बालवाडीत शिरलेल्या विषारी सापाशी झुंज देत सुमारे ३० लहान मुलांचे प्राण वाचवले, मात्र या संघर्षात स्वतःचा जीव गमावला. ही घटना त्या वेळी घडली, जेव्हा गावातील बालवाडीत लहान मुले खेळत होती. त्याच वेळी एक विषारी साप हळूहळू शाळेच्या आवारात शिरत होता. मुलांना याची कोणतीही कल्पना नव्हती, मात्र परिसरात फिरणाऱ्या ‘काली’ने धोका ओळखताच तात्काळ त्या सापावर झेप घेतली.
गावकऱ्यांच्या माहितीनुसार, कालीने निर्भयपणे सापाला अडवले आणि मुलांच्या दिशेने जाण्यापासून रोखले. या झुंजीदरम्यान सापाने तिला अनेकदा चावा घेतला. चेहरा आणि तोंडावर गंभीर जखमा झाल्या तरीही कालीने लढाई सोडली नाही. अखेर साप ठार झाला, पण त्यावेळी विष तिच्या शरीरात पसरले होते.लढाईनंतर काही वेळातच काली जमिनीवर कोसळली आणि तिचा मृत्यू झाला. या घटनेने संपूर्ण गाव शोकाकुल झाले असून, वाचलेल्या मुलांच्या कुटुंबीयांनी तिला देवदूतासारखीच मान्यता दिली आहे. गावकऱ्यांनी तिच्या अंत्यसंस्कारासाठी विशेष व्यवस्था केली. kindergarten तिचे पार्थिव फुलांनी सजवून सन्मानपूर्वक अंत्ययात्रा काढण्यात आली. स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार, काली नेहमीच गावात फिरत असे आणि सर्वांची लाडकी होती. तिच्या निस्वार्थ शौर्यामुळे आज तिची कहाणी केवळ प्राणी-मानव नात्याचे नव्हे तर निष्ठा आणि त्यागाचे प्रेरणादायी उदाहरण म्हणून पाहिली जात आहे.