-अनेक भागात होती वीज गुल
-महापारेषणचे रोहित्र होते ओव्हरलोड
-‘बॅकफीड’ देऊन केली बहाल
-उकाड्याने हैराण ग्राहकांना दिला दिलासा
नागपूर,
Mahavitaran मानकापूर १३२ केव्ही उपकेंद्रातील महापारेषणच्या रोहित्रावर अचानक अतिरिक्तभार आल्याने आज दुपारी दीक्षाभूमी उपकेंद्रांतर्गत येणार्या अनेक भागांचा वीज पुरवठा विस्कळीत झाला. मात्र, महावितरणच्या अभियंत्यांनी तातडीने हालचाली करत पर्यायी मार्गाने वीज पुरवठा सुरू केल्याने नागरिकांना मोठा दिलासा मिळाला.
महावितरणच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, दुपारी ४.०१ वाजता मानकापूर उपकेंद्रातून येणारा ३३ केव्ही मानकापूर सप्लाय सिस्टम ओव्हर लोडिंगमुळे तांत्रिक बिघाड टाळण्यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून बंद करण्यात आला. यामुळे ३३ केव्ही दीक्षाभूमी उपकेंद्रातील सर्व आऊटगोइंग फीडर्सचा वीज पुरवठा खंडित झाला. ४.१२ वाजेपर्यंत हा पुरवठा बंद होता.
तारेवरची कसरत
मानकापूरचा पुरवठा खंडित झाल्याने महावितरण प्रशासनाने तातडीने केंद्रावरून वीज घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्या केंद्रावरही ओव्हर लोडिंगची समस्या निर्माण झाल्याने ४.१५ ते ४.१६ या दरम्यान पुन्हा एकदा पुरवठ्यात अडथळा निर्माण झाला. संपूर्ण पुरवठा सुरळीत करण्यासाठी तंत्रज्ञांना तारेवरची कसरत करावी लागली.
Mahavitaran विजेचा वाढता वापर व तांत्रिक मर्यादा लक्षात घेता, प्रशासनाने अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने लोड शिफ्टिंग केले. दुपारी वाजता १० एव्हीए ट्रान्सफॉर्मर-२ चा भार ३३ केव्ही मानकापूर सप्लायवर वळवण्यात आला. इतर उर्वरित रोहित्रांचा भार शंकरनगर सप्लायवर ठेवण्यात आला. दुपारी ४.४२ वाजता व्हीएनआयटी उपकेंद्रातील ११ केव्ही फीडर्सद्वारे श्रद्धानंद पेठ व आठरस्ता फीडरला बॅकफीड देऊन वीज पुरवठा सुरळीत करण्यात आला.
महापारेषणच्या उपकेंद्रातील ओव्हर लोडिंगमुळे ही परिस्थिती ओढवली असली, तरी केलेल्या प्रभावी नियोजनामुळे अवघ्या काही मिनिटांत पर्यायी व्यवस्था करून मोठ्या भागाचा अंधार दूर करण्यात यश आले. सध्या परिस्थिती नियंत्रणात असून पुरवठा सुरळीत सुरू असल्याची माहिती महावितरणच्या सूत्रांनी दिली आहे.