मालेगाव,
Malegaon murder case मालेगाव तालुयातील पांगरी नवघरे येथील पतीने आपल्या पत्नीची धारदार शस्त्राने वार करून हत्या केल्याची धक्कादायक घटना आज, २७ एप्रिल रोजी सकाळी शहरातील अकोला फाटा परिसरात घडली. कौटुंबिक वादातून हे टोकाचे पाऊल उचलण्यात आल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, मृतक पुष्पा विठ्ठल वाघ (वय ३४) रा. पांगरी नवघरे ता. मालेगाव आणि आरोपी पती विठ्ठल परसराम वाघ यांच्यात गेल्या काही दिवसांपासून सातत्याने कौटुंबिक कारणावरून वाद होत होते. २७ एप्रिल रोजी सकाळी ८ ते ८:३० वाजेच्या सुमारास मालेगाव येथील अकोला फाटा भागातील पोस्ट ऑफिससमोर पुन्हा त्यांच्यात वाद झाला. हा वाद विकोपाला गेल्याने आरोपी विठ्ठल वाघ याने आपल्या पत्नीवर धारदार चाकूने सपासप वार केले. या हल्ल्यात पुष्पा वाघ यांचा जागीच मृत्यू झाला. या प्रकरणी मृतकेचा Malegaon murder case भाऊ ओम नारायण राऊत (वय २७) रा. बेलगाव, जि. बुलढाणा यांनी मालेगाव पोलिस स्टेशनमध्ये फिर्याद दिली आहे. त्यांच्या तक्रारीवरून आरोपी विठ्ठल परसराम वाघ याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम १०३(१) (जुने भारतीय दंड विधान कलम ३०२) अन्वये खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
घटनेची माहिती मिळताच सहायक पोलिस अधीक्षक अग्रवाल यांनी घटनास्थळाला भेट देऊन पाहणी केली. या प्रकरणाचा पुढील तपास मालेगाव पोस्टे पोलिस निरीक्षक राजेश खेरडे करत आहेत. पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले आहे.