पुसदमध्ये मीना निरंजन नाईक यांच्या नेतृत्वात निवेदन सादर
पुसद,
Meena Niranjan Naik ‘धरण उशाला, पण कोरड घशाला’ अशीच स्थिती असलेल्या पुसद तालुक्यातील माळपठार भागातील गावांना हक्काचे पाणी मिळावे, यासाठी महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांचे चिरंजीव निरंजन नाईक यांनी ‘एंन्ट्री’ केली आहे. काही दिवसांपूर्वी ते पुसद शहरात येऊन गेले. त्यानंतर त्यांच्या पत्नी मीना नाईक व कन्या निहारिका यांनी युवकांसोबत माळपठारचा दौरा केला. सिंचनाअभावी होत असलेल्या शेतकèयांच्या हालअपेष्टा प्रत्यक्ष बघितल्या. निरंजन नाईक यांनी या संदर्भात उपविभागीय अधिकारी पुसद यांना पत्र लिहीले. तसेच ‘लिफ्ट इरिगेशन’ प्रकल्प सुरू करण्यासाठी मुख्यमंत्र्यांनाही पत्र लिहिले. यामुळे शेतकèयांचे उत्पादन व जीवनमान सुधारेल, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. या संदर्भात मीना निरंजन नाईक व निहारिका निरंजन नाईक यांच्या उपस्थितीत उपविभागीय अधिकारी तसेच तहसीलदारांना निवेदन देण्यात आले.
Meena Niranjan Naik ईसापूर धरण जवळ असूनही माळपठारातील बहुतांश गावांना पाणीपुरवठा होत नाही. परिणामी नागरिकांना जीवनावश्यक पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. सुमारे 40 गावे व 35 ते 40 हजार शेतकरी या समस्येमुळे प्रभावित झाले आहेत. पाण्याअभावी शेती कोलमडत असल्याने अनेकांना स्थलांतराचा पर्याय स्वीकारावा लागत आहे. या पृष्ठभूमीवर इसापुर धरणातून लिफ्ट इरिगेशनद्वारे पाणीपुरवठा करण्याचा प्रकल्प तातडीने मंजूर करून राबवावा, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे. तसेच शासन दरबारी पाठपुरावा करून या प्रकल्पास गती देण्याची विनंतीही करण्यात आली. यावेळी पिकविमा योजनेतून यवतमाळ जिल्हा वगळण्यात आल्याबाबत तीव्र नाराजी त्यांनी व्यक्त केली असून जिल्ह्याचा पुन्हा समावेश करावा, अशी मागणीही करण्यात आली. यावेळी माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या स्नुषा मीना निरंजन नाईक, नात निहारिका निरंजन नाईक, पुसद तालुक्यातील आदित्य जाधव, शिवाजी इंगळे, शेषराव राठोड आशिष पवार तसेच तरुण वर्ग, ग्रामस्थ व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.