‘आप’ला धक्का, भाजपला फायदा!

खासदारांचे भाजपमध्ये विलीनीकरण मंजूर

    दिनांक :27-Apr-2026
Total Views |
नवी दिल्ली,
Merger of AAP MPs into BJP approved राज्यसभेत सोमवारी मोठा राजकीय उलटफेर घडला असून आम आदमी पक्षासाठी हा मोठा धक्का मानला जात आहे. राज्यसभेचे अध्यक्ष सी. पी. राधाकृष्णन यांनी आम आदमी पक्षाच्या सात खासदारांच्या भारतीय जनता पक्षात झालेल्या विलीन होण्याला अधिकृत मान्यता दिली आहे. या निर्णयानंतर वरिष्ठ सभागृहातील आम आदमी पक्षाचे संख्याबळ लक्षणीयरीत्या घटून केवळ तीन खासदारांवर आले आहे. तर दुसरीकडे भारतीय जनता पक्षाचे संख्याबळ वाढून ११३ झाले असून राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे एकूण संख्याबळ १४८ वर पोहोचले आहे.
 

BJP approved 
 
विलीन झालेल्या खासदारांमध्ये राघव चड्ढा, अशोक मित्तल, हरभजन सिंग, संदीप पाठक, विक्रमजीत साहनी, स्वाती मालीवाल आणि राजिंदर गुप्ता यांचा समावेश आहे. या सर्वांना आता राज्यसभेच्या अधिकृत नोंदीत भारतीय जनता पक्षाचे सदस्य म्हणून दर्शवले जात आहे.मिळालेल्या माहितीनुसार, या खासदारांनी काही दिवसांपूर्वीच सभापतींकडे पत्र देत स्वतःला भारतीय जनता पक्षाचे सदस्य म्हणून मान्यता देण्याची मागणी केली होती. त्यानंतर सभापतींनी आवश्यक प्रक्रिया पूर्ण करत या मागणीला मंजुरी दिली. दरम्यान, आम आदमी पक्षाने या घडामोडीवर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. पक्षाने या खासदारांचे सदस्यत्व रद्द करण्याची मागणी याआधीच केली होती. पक्षाच्या काही नेत्यांच्या मते, पक्ष सोडून दुसऱ्या पक्षात जाणाऱ्या खासदारांवर योग्य ती कारवाई होणे आवश्यक आहे.