त्या’ मृत वाघिणीचे बछडे सुरक्षित

वनविभागाची पाळत

    दिनांक :27-Apr-2026
Total Views |
सिंदेवाही/नवरगाव,
Tigress T-84 death रत्नापूरजवळील नियत क्षेत्र नाचण भट्टी अंतर्गत मृत पावलेल्या टी-84 वाघिणीचे तिन्ही बछडे नवरगाव परिसरात सुरक्षित असून, त्यांच्यावर वनविभाग पाळत ठेवून आहे.
 

Tigress T-84 death Chandrapur, 
तालुक्यातील नवरगावलगत रत्नापूर शेतशिवारात रविवारी घडलेल्या नाट्यमय घटनेने परिसरात खळबळ उडाली. मक्याच्या शेतात बैलाची शिकार करून बछड्यांसह दबा धरून बसलेल्या टी-84 या वाघिणीने अचानक वनरक्षक सज्जन पारेकर यांच्यावरू हल्ला करून गंभीर जखमी केले. घटनेनंतर अवघ्या तासात 9 ते 10 वर्षे वयाच्या या वाघिणीचा मृतदेह त्याच परिसरात आढळून आला. वाघिणीचा मृत्यू नेमका कशामुळे झाला, हे अद्याप स्पष्ट झाले नसून, शवविच्छेदन अहवालानंतरच खरे कारण समोर येणार आहे.
दरम्यान, या घटनेमुळे आईचा आधार हरपलेल्या बछड्यांच्या सुरक्षिततेबाबत चिंता व्यक्त होत असताना, वनविभागाने दिलासा देणारी माहिती दिली आहे. वाघिणीचे बछडे सुरक्षित ठिकाणी असून, त्यांच्यावर वनविभागाची सतत पाळत आहे. वरिष्ठ कार्यालयाकडून बछड्यांना पकडण्यासाठी अजूनही परवानगी मिळालेली नाही. त्यांच्यावर वनविभाग देखरेख ठेवत असून, वरिष्ठांची परवानगी प्राप्त होताच त्यांना पकडून सुरक्षित ठिकाणी ठेवण्यात येईल, अशी माहिती आहे.याबाबत वनपरिक्षेत्र अधिकारी अंजली सायंकार-बोरावार यांनी, टी-84 वाघिणीचे बछडे पूर्णपणे सुरक्षित आहेत. त्यांच्यावर आमचे बारीक लक्ष आहे, असे सांगितले. दरम्यान, या घटनेमुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असल्याने वनविभागाने सतर्कता वाढवली आहे. वाघिणीच्या हल्ल्यात जखमी झालेले वनरक्षक पारेकर यांच्यावर चंद्रपूर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू असून, सध्या त्यांची प्रकृती स्थिर आहे.