दोषींवर कारवाईची आदिवासी टायगर सेनेची मागणी
मारेगाव,
Tribal woman dies in stone quarry तालुक्यातील नरसाळा येथील पेसा क्षेत्रात असलेल्या कालबाह्य व असुरक्षित दगड खाणीमुळे एका आदिवासी महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना समोर आली. यामुळे परिसरात संतापाची लाट उसळली आहे. या प्रकरणी संबंधित खाण मालकावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करून सर्व धोकादायक खाणी तत्काळ बुजविण्याची मागणी आदिवासी टायगर सेना तालुका अध्यक्ष विवेक तोडासे यांनी केली आहे. 19 एप्रिल रोजी नरसाळा येथील कालबाह्य दगड खाणीत साचलेल्या पाण्यात पडून बेबी तुळशीराम राजगळकर या आदिवासी महिलेचा मृत्यू झाला. ही खाण बराच काळापासून बंद असूनही ती असुरक्षित अवस्थेत असल्याने ही दुर्घटना घडल्याचा आरोप करण्यात आला आहे.
Tribal woman dies in stone quarry तोडासे यांनी जिल्हाधिकारी यवतमाळ यांना दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे. संबंधित खाण धारकाने कोणतीही सुरक्षा व्यवस्था, कुंपण किंवा इशारा फलक न लावता नियमांचे उल्लंघन केले आहे. तसेच, प्रशासनानेही याकडे दुर्लक्ष केल्यामुळे हा प्रकार घडल्याचा आरोप करण्यात आला आहे. या घटनेला केवळ अपघात न मानता सदोष मनुष्यवध मानून संबंधित खाण मालकावर भारतीय न्याय संहिता अंतर्गत गुन्हा दाखल करावा, अशी ठोस मागणी करण्यात आली आहे. यासोबतच पेसा क्षेत्रातील सर्व कालबाह्य व धोकादायक खाणी तत्काळ बुजविण्याचे आदेश देण्यात यावेत, तसेच मृत महिलेच्या कुटुंबीयांना तातडीने शासकीय मदत व नुकसानभरपाई देण्यात यावी, अशीही मागणी निवेदनातून करण्यात आली आहे. निवेदन देताना जिल्हा महासचिव अमोल कुमरे, विदर्भ संघटक रंजना आत्राम, वणी तालुका अध्यक्ष लहानू सालूरकर, महेश आत्राम, पूजा वासरीकर, सुनील उईके, रीना ठमके, दीपा कोवे उपस्थित होते.