भारतातील अपयशामुळे पाक अफगाणिस्तानवर आक्रमक!

टीटीपीचा आसिम मुनीरवर घणाघाती हल्ला

    दिनांक :27-Apr-2026
Total Views |
इस्लामाबाद,
TTP attack on Asim Munir इस्लामाबादमध्ये नव्या वादाला तोंड फुटले आहे, कारण तहरीक-ए-तालिबान पाकिस्तानने पाकिस्तानी लष्करप्रमुख आसिम मुनीर यांच्यावर थेट आणि गंभीर आरोप केले आहेत. संघटनेच्या मासिकात प्रसिद्ध झालेल्या लेखामध्ये मुनीर यांच्या धोरणांवर कठोर शब्दांत टीका करताना, त्यांच्या निर्णयांमुळे अफगाणिस्तानशी तणाव वाढल्याचा दावा करण्यात आला आहे. या लेखात २०२५ मध्ये भारतासमोर पाकिस्तानला अपयश पत्करावे लागल्याचे नमूद करत, आंतरराष्ट्रीय स्तरावर अपेक्षित पाठिंबा न मिळाल्याने पाकिस्तान आता अफगाणिस्तानकडे आक्रमक भूमिकेत वळल्याचा आरोप करण्यात आला आहे.
 
 
TTP attack on Asim Munir
 
मासिकातील मांडणीनुसार, स्वतःची प्रतिमा उंचावण्यासाठी आणि अंतर्गत दबाव झाकण्यासाठी मुनीर यांनी अफगाणिस्तानविरुद्ध कारवाया वाढवल्या. त्यांना हट्टी आणि स्वार्थी नेतृत्वाचे उदाहरण ठरवत, प्रादेशिक स्थैर्य धोक्यात घालून सत्ता मजबूत करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोपही करण्यात आला आहे. दरम्यान, एकेकाळी सहकार्याचे संबंध असलेले पाकिस्तान आणि अफगाणिस्तान आता थेट संघर्षाच्या उंबरठ्यावर पोहोचले आहेत. पाकिस्तानकडून सीमापार हल्ल्यांमध्ये सहभागी दहशतवाद्यांना आश्रय दिल्याचा आरोप अफगाणिस्तानवर केला जात असला, तरी तेथील सत्ताधाऱ्यांनी हे सर्व आरोप नाकारले आहेत.
फेब्रुवारीच्या शेवटी पाकिस्तानने केलेल्या हवाई कारवाईनंतर परिस्थिती अधिकच चिघळली आणि त्याला प्रत्युत्तर म्हणून अफगाणिस्तानकडून जमिनीवरून हल्ला करण्यात आला. त्यानंतर पाकिस्तानने उघडपणे युद्धजन्य स्थितीची घोषणा केल्याचेही नमूद करण्यात आले आहे. या लेखात आणखी असा दावा करण्यात आला आहे की, भारतासोबतच्या संघर्षात अपेक्षित आंतरराष्ट्रीय साथ न मिळाल्याने पाकिस्तानने अफगाणिस्तानला तुलनेने सोपी आघाडी मानत तेथे दबाव वाढवला. पहलगाममधील हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानातील दहशतवादी तळांवर केलेल्या कारवायांमुळे परिस्थिती अधिक ताणली गेली. या कारवाईत लष्कर-ए-तोयबा, जैश-ए-मोहम्मद आणि हिजबुल मुजाहिदीनसारख्या संघटनांचे अनेक तळ उद्ध्वस्त झाल्याचा उल्लेखही या लेखात करण्यात आला आहे.