कोलकाता,
West Bengal केंद्र सरकारने पश्चिम बंगालचे पोलिस महासंचालक (डीजीपी) आणि पोलिस महानिरीक्षक (आयजीपी) सिद्धनाथ गुप्ता यांची सेवा त्यांच्या 30 एप्रिलच्या नियोजित सेवानिवृत्तीच्या तारखेनंतर सहा महिन्यांसाठी वाढवली आहे. ही माहिती सोमवारी जारी केलेल्या एका आदेशात देण्यात आली.
सिद्धनाथ गुप्ता हे 1992 च्या तुकडीचे भारतीय पोलिस सेवा (आयपीएस) अधिकारी आहेत.16 मार्चला निवडणूक आयोगाने त्यांची राज्याचे डीजी आणि आयजीपी म्हणून नियुक्ती केली होती. विद्यमान अधिकारी पियुष पांडे यांना पदावरून हटवल्यानंतर दुसऱ्याच दिवशी या नियुक्त्या झाल्या.
गुप्ता 30 एप्रिलला होणार होते सेवानिवृत्त
सोमवारी जारी केलेल्या आदेशात आयोगाने म्हटले आहे की, मंत्रिमंडळाच्या नियुक्ती समितीने गृह मंत्रालयाच्या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे. ज्यामध्ये जनहितासाठी नियमांमध्ये शिथिलता आणण्यात आली आहे. सिद्धनाथ गुप्ता 30 एप्रिलला सेवानिवृत्त होणार होते. आता त्यांची सेवा 30 एप्रिल नंतर सहा महिन्यांसाठी वाढवण्यात आली आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीसंदर्भात एक मोठे विधान केले आहे. ते म्हणाले, भाजपा सत्तेवर येवो वा न येवो, निवडणुकीनंतर राज्यात किमान सात दिवस केंद्रीय दलांची तैनाती कायम राहील. त्यांनी मतदारांना कोणत्याही भीतीशिवाय किंवा दबावाशिवाय मतदान करण्याचे आवाहन केले. तसेच निवडणूक प्रक्रियेदरम्यान आणि नंतर कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी केंद्रीय दल उपस्थित राहतील, असेही त्यांनी सांगतिले.