गांधीनगर,
yusuf-pathan-statement : पश्चिम बंगालमधील बहारामपूरचे तृणमूल काँग्रेसचे (टीएमसी) खासदार आणि माजी क्रिकेटपटू युसूफ पठाण यांच्या एका वक्तव्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. त्यांनी गुजरातमधील भाजपची प्रशंसा करत, तेथून पक्षाला सत्तेवरून हटवणे कठीण होईल, असे म्हटले आहे.
युसूफ पठाण यांनी रविवारी (२६ एप्रिल, २०२६) गुजरात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत मतदान केले. मतदान केल्यानंतर ते म्हणाले की, गुजरातमध्ये भाजप इतका मजबूत आहे की तो पुढील ४०-५० वर्षे सत्तेत राहू शकतो.
त्यांच्या मते, जो पक्ष लोकांसाठी काम करतो आणि लोकांना आवडतो, तोच दीर्घकाळ सत्तेत राहतो. ते असेही म्हणाले की, गुजरातची जनता विकासाच्या नावावर मतदान करते आणि म्हणूनच भाजपला पाठिंबा मिळतो.
पश्चिम बंगालचा संदर्भ देत ते म्हणाले की, तेथील जनता ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखालील टीएमसीला पसंती देते. मतदान हा लोकशाही हक्क असल्याचे सांगत त्यांनी लोकांना विचारपूर्वक मतदान करण्याचे आवाहनही केले.