जकार्ता,
4 women crushed by train near Jakarta इंडोनेशियातील जकार्ता शहराजवळील एका स्थानकात सोमवारी भीषण रेल्वे अपघात घडला. एका वेगवान गाडीने थांबलेल्या दुसऱ्या गाडीच्या मागील डब्याला जोरदार धडक दिल्याने किमान चार जणांचा मृत्यू झाला, तर अनेक प्रवासी जखमी झाले. या धडकेत काही डबे मोठ्या प्रमाणात नुकसानग्रस्त झाले असून, त्यामध्ये काही प्रवासी अडकून पडल्याची माहिती समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ‘आर्गो ब्रोमो आंगग्रेक’ नावाची लांब पल्ल्याची गाडी बेकासी तिमूर स्टेशन येथे उभी असलेल्या प्रवासी गाडीच्या शेवटच्या डब्याला धडकली. हा डबा महिलांसाठी राखीव होता, ज्यामध्ये महिलांच्या सुरक्षिततेसाठी स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली होती. अपघातानंतर तातडीने बचावकार्य सुरू करण्यात आले असून, जखमी प्रवाशांना उपचारासाठी रुग्णालयात हलवण्यात आले आहे.
अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, जखमी झालेल्या अनेक प्रवाशांवर उपचार सुरू आहेत. दरम्यान, नुकसानग्रस्त डब्यात अडकलेल्या प्रवाशांना बाहेर काढण्यासाठी बचाव पथके युद्धपातळीवर प्रयत्न करत आहेत. दुसऱ्या गाडीत प्रवास करणारे सर्व प्रवासी सुरक्षित असल्याचेही सांगण्यात आले आहे.घटनेनंतर परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले. स्थानिक माध्यमांवर प्रसारित झालेल्या दृश्यांमध्ये घाबरलेले प्रवासी आणि आपल्या नातेवाईकांची चौकशी करण्यासाठी धावपळ करणारे लोक दिसून आले. या अपघाताबद्दल सरकारी रेल्वे संस्थेने प्रवाशांची माफी मागितली असून, या घटनेमागील कारणांचा शोध घेण्यासाठी तपास सुरू करण्यात आला आहे. दरम्यान, त्या देशातील जुने रेल्वे जाळे आणि सुरक्षेतील त्रुटी यामुळे अशा घटना अधूनमधून घडत असल्याचेही दिसून येते. यापूर्वीही विविध अपघातांमध्ये अनेकांना आपला जीव गमवावा लागला असून, रेल्वे सुरक्षेबाबत चिंता व्यक्त केली जात आहे.