मेळघाटच्या जंगलात पुन्हा पेटला वणवा

वन्यप्राणी व वनसपंदेचे नुकसान

    दिनांक :28-Apr-2026
Total Views |
धारणी, 
melghat-forest : गुगामल वन्यजीव विभागाच्या ढाकणा परिक्षेत्राच्या जंगलात २७ एप्रिल रोजी दिवसभर जंगलातील झाडे जळत होती तर दुसरीकडे वन कर्मचारी, वन व्यवस्थापन समिती आणि फायरफायटर आगीवर नियंत्रणासाठी धडपडत होते. तसेच प्रादेशिक वनविभागाचे धारणी परिक्षेत्रातील बोड, लवादा व सोसोखडाच्या जंगलात गेल्या आठवड्यात ठिकठिकाणी आग लागून जंगलाचे नुकसान झालेले आहे.
 
 
k
 
 
 
धारणी परिसरात तापमान ४३ डिग्री सेल्सियसवर पोहचताच उष्णकटीबंधीय पानगळीच्या जंगलात ठिकठिकाणी आगी लागत आहेत. यामुळेच वनांचे नुकसान होऊन वन्यप्राण्यांना भटकंती करावी लागत आहे. जंगलातील वणव्यामुळे तापमान वाढून वन्यप्राण्यांना त्रास होतो. याशिवाय वणव्यात निवडक प्रजातीची हिरवीगार झाडे पण जळून जातात. सॅटेलाईटने माहिती मिळाल्यावर कर्मचार्‍यांना आगीच्या ठिकाणी पोहचण्यासाठी भरपूर प्रयत्न करावे लागतात. कारण दाट जंगलात अथवा पहाडांवर पोहचण्यासाठी रस्त्यांचा अभाव आहे. धारणीपासून ३० कि. मी. अंतरावरील ढाकणा परिक्षेत्रातील कवालडिंगरी, पिपरीकुवा, सुकडीहिंडा आणि बंदरझिरा नावाच्या जंगलात २७ एप्रिलला सकाळपासून आग लागलेली होती. आगीचे प्रमाण इतके जास्त होते की, ५ किमी अंतरावरून सुद्धा दिसत होते. या हंगामातील ही दुसरी मोठी आग होती. परिक्षेत्र अधिकारी मनोज चौधरी यांनी माहिती मिळताच पथकाला त्या ठिकाणी पाठविले. पारा ४३ अंशावर पोहचल्यानंतर जंगलातील वणवा नियंत्रित करणे फार अवघड मानले जाते. याशिवाय व्याघ्र प्रकल्प व प्रादेशिक वन विभागाजवळ पुरेशी साधने व मनुष्यबळाचा अभाव असल्याने आगीवर तात्काळ नियंत्रण करणे अशक्य होत असते. याशिवाय आगीचे नेमके कारण पण नेहमी गुलदस्त्यात राहते.
 
 
धारणी परिक्षेत्रामधील बोड, लवादा आणि सोसोखेडा नजिकच्या जंगलात पण गेल्या आठवड्यात तुरळक स्वरुपात ठिकठिकाणी आगी लागण्याची गंभीर माहिती आहे. आगीत औषधी वनस्पती आणि उन्हाळ्यात हिरवीगार असणारी झाडे सुद्धा जळून खाक होत असतात, हे एक मोठे दुर्दैवच आहे. आग लागताच जंगलातील तापमान वाढते, यामुळे वन्यप्राणी आणि पक्षांना फार त्रास होतो. प्रामुख्याने तृणभक्षी प्राण्यांवर भटकंतीची पाळी येत असते.