वर्धा,
advanced-microsurgery : सावंगी (मेघे) येथील सिद्धार्थ गुप्ता कॅन्सर हॉस्पिटलमधील डॉक्टरांनी प्रगत मायक्रोसर्जरी (डीआयईपी फ्लॅप) तंत्राचा वापर करून संपूर्ण स्तन पुनर्निर्माणाची शस्त्रक्रिया यशस्वीपणे केली.
येथील रहिवासी ४२ वर्षीय महिलेला स्तनाचा कर्करोग झाल्याचे निदान झाले होते. तिने आधीच ८ किमोथेरपीच्या सायकल पूर्ण केल्या होत्या. डॉ. भूषण जाजू आणि त्यांच्या चमूच्या नेतृत्वाखालील सर्जिकल ऑन्कोलॉजी विभागाने तिच्यावर ‘मॉडिफाइड स्किन स्पेरिंग रॅडिकल मॅस्टेटॉमी विथ अॅसिलरी डिसेशन’ ही शस्त्रक्रिया केली. या प्रक्रियेत स्तनातील कर्करोगग्रस्त ऊतक काढून टाकण्यात आले. मात्र, बाहेरील त्वचा सुरक्षित ठेवण्यात आली. यानंतर लगेचच प्लास्टिक सर्जन डॉ. फिरोज बोरले यांच्या नेतृत्वाखालील प्लास्टिक आणि रिकंस्ट्रटिव्ह सर्जरी विभागाने तिच्या संपूर्ण स्तनाची पुनर्रचना केली.
डॉ. भूषण जाजू (ऑन्कोसर्जन) आणि डॉ. फिरोज बोरले (मुख्य प्लास्टिक सर्जन, एसजीएमसीएच) यांनी सांगितले की: स्तनाचा कर्करोग असलेल्या बहुतांश रुग्णांमध्ये स्तन जपून ठेवण्याची शस्त्रक्रिया करता येते, ज्यात स्तनाचा फतकर्करोगग्रस्त भाग काढला जातो आणि त्याचवेळी फ्लॅपच्या मदतीने स्तनाची पुनर्रचना केली जाऊ शकते. मात्र काही प्रकरणांमध्ये आजाराचा प्रसार जास्त असल्याने संपूर्ण स्तन काढावा लागतो. त्यामुळे शरीराच्या आकारात बदल होतो आणि आत्मविश्वास कमी होऊ शकतो. अशा रुग्णांसाठी स्वतःच्या ऊतींचा वापर करून मायक्रोसर्जरीद्वारे स्तन पुनर्निर्माण करणे ही एक नवी आशा ठरते. यामुळे शरीराचा नैसर्गिक आकार परत मिळतो आणि रुग्णांचा आत्मविश्वासही वाढतो.