चंद्रपूर,
agricultural-center-licenses-suspended : जिल्ह्यातील कृषी केंद्र संचालकांकडून खत विक्रीमध्ये करण्यात येणार्या अनियमितेची गंभीर दखल घेत, कृषी विभागाने कारवाई केली आहे. 24 एप्रिल रोजी विशेष सुनावणीअंती जिल्ह्यातील तब्बल 16 कृषी केंद्रांचे परवाने निलंबित करण्याचे आदेश देण्यात आले आहे. तर, 3 कृषी केंद्राचे परवाने कायमस्वरुपी रद्द करण्यात येऊन, 12 कृषी केंद्रांना सक्त ताकीद देण्यात आली आहे.
जिल्ह्यात काही कृषी केंद्र चालकांकडून खतांच्या साठ्याबाबत आणि विक्री दराबाबत नियमांचे उल्लंघन होत असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. त्यामुळे जिल्हा गुण नियंत्रण पथकाने विविध केंद्रांची अचानक तपासणी केली असता, अनेक ठिकाणी खतांच्या साठ्यात तफावत आणि विक्रीच्या नोंदीमध्ये अनियमितता असल्याचे निदर्शनास आले. या तक्रारींच्या आधारे संबंधित केंद्र चालकांना सुनावणीसाठी पाचारण करण्यात आले होते.
प्रत्येक प्रकरणाची सखोल चौकशी करण्यात आली. सुनावणी दरम्यान केंद्र चालकांनी सादर केलेले खुलासे असमाधानकारक आढळल्याने 16 कृषी केंद्रांवर निलंबनाची कारवाई निश्चित करण्यात आली. खत विक्रीत किंवा इतर कोणत्याही कृषी निविष्ठांच्या बाबतीत गैरप्रकार करणार्या केंद्र चालकांवर यापुढेही अशाच प्रकारची कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल, असे कृषी विभागाने स्पष्ट केले आहे.
परवाने निलंबन झालेले कृषी केंद्र
दुर्गापूर येथील श्री. ग्रो ट्रेडर्स, वरोड्यातील शिव कृषी केंद्र, कल्पना कृषी केंद्र, जिबगावातील आदर्श कृषी केंद्र, निफंद्रा येथील धाईत कृषी केंद्र, सावली येथील साई कृषी केंद्र, गिरगावातील आदिवासी विविध कार्यकारी सहकारी संस्था, मांगली येथील देशमुख कृषी केंद्र, पळसगावातील सेवा सहकारी संस्था, मेंढा येथील प्रभु कृपा कृषी केंद्र, पिंपळगाव येथील ठेंगरे कृषी केंद्र, विनोद कृषी केंद्र, भद्रावतीतील पवन कृषी केंद्र, समर्थ ग्रो एजन्सी, पाथरी येथील पाथरी सेवा सहकारी संस्था, बेंबाळ येथील गणेश कृषी केंद्र या कृषी केंद्रांचे परवाने निलंबित करण्यात आले आहेत. तर कोरपना येथील तिरुमला ग्रो एजन्सी, गेवरा बुज येथील सेवा सहकारी संस्था, व्याहाड खुर्द येथील कास्तकार कृषी केंद्र या कृषी केंद्राचे परवाने रद्द करण्यात आले आहे.