मुंबई,
Bharat Kapoor passes away हिंदी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते भरत कपूर यांचे निधन झाले. त्यांच्या जाण्याने मनोरंजन विश्वावर शोककळा पसरली आहे. वयाच्या ८० व्या वर्षी त्यांनी मुंबईतील सायन रुग्णालय येथे अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या प्रकृतीत गेल्या काही दिवसांपासून बिघाड होत होता आणि शरीरातील अवयव नीट काम करेनासे झाले होते, अशी माहिती समोर आली आहे. त्यांच्या स्मरणार्थ ३० एप्रिल रोजी प्रार्थना सभेचे आयोजन करण्यात येणार आहे. त्यांच्या निधनाची बातमी समजताच चाहत्यांमध्ये तसेच चित्रपटसृष्टीत दुःखाची लाट उसळली असून अनेकांनी सामाजिक माध्यमांद्वारे त्यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे.
भरत कपूर यांनी आपल्या दीर्घ कारकिर्दीत विविध प्रकारच्या भूमिका साकारत प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण केले होते. १९७०, ८० आणि ९० च्या दशकात त्यांनी अनेक चित्रपटांमध्ये प्रभावी कामगिरी केली. १९७२ साली त्यांनी अभिनय क्षेत्रात पाऊल ठेवले आणि त्यानंतर सातत्याने विविध भूमिका साकारत त्यांनी आपली वेगळी ओळख निर्माण केली. छोट्या, सहाय्यक किंवा खलनायकी भूमिका असोत, प्रत्येक पात्र त्यांनी जिवंत केले.
चित्रपटांबरोबरच दूरचित्रवाणी मालिकांमध्येही त्यांनी आपल्या अभिनयाची छाप उमटवली होती. मात्र २०११ नंतर ते पडद्यापासून दूर राहिले होते, तरीही त्यांच्या कामाची आठवण चाहत्यांच्या मनात कायम होती. ‘नूरी’, ‘राम बलराम’, ‘लव्ह स्टोरी’, ‘बाजार’, ‘आखरी रास्ता’, ‘सत्यमेव जयते’, ‘स्वर्ग’, ‘खुदा गवाह’, ‘रंग’, ‘बरसात’ आणि ‘साजन चले ससुराल’ यांसारख्या चित्रपटांमधील त्यांच्या भूमिका आजही लक्षात राहतील. तसेच ‘कॅम्पस’, ‘परंपरा’, ‘सांस’, ‘अमानत’, ‘भाग्यविधाता’ आणि ‘कहानी चंद्रकांता की’ या मालिकांमधूनही त्यांनी प्रेक्षकांचे मनोरंजन केले होते. त्यांच्या अभिनयामुळे ते आज नसले तरी त्यांच्या आठवणी मात्र कायम जिवंत राहतील.