चंद्रपूर,
tadoba-tiger-reserve : ‘ब्रिक्स 2026’चे अध्यक्ष्पद भारताकडे आहे. त्या अनुषंगाने, ब्रिक्स सदस्य देशांतील प्रतिनिधी मंडळाने शनिवारी ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाला भेट दिली. भारतात विकसित होत असलेल्या वन्यजीव संवर्धन पद्धती व समुदायाधारित शाश्वत उपजीविका उपक्रमाचा त्यांनी येथे प्रत्यक्ष अनुभव घेतला.
18 व्या ब्रिक्स परिषदेनिमित्त, राष्ट्रीय प्रत्यक्ष कर अकादमी यांनी 20 एप्रिल ते 26 एप्रिलदरम्यान ‘ब्रिक्स यंग टॅक्स प्रोफेशनल्स वर्किंग ग्रुप-क्षमता वृद्धी कार्यशाळा’ आयोजित केली होती. या कार्यशाळेचा एक भाग म्हणून ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प भेटीचे आयोजन करण्यात आले होते.
भेटीची सुरुवात पहाटेच्या सफारीने झाली, ज्यात प्रतिनिधींना प्रकल्पातील विज्ञानाधिष्ठित व व्यवस्थापनकेंद्री संवर्धन पद्धतींचा सविस्तर परिचय देण्यात आला. यावेळी अत्याधुनिक गस्त व्यवस्था, ‘रिअल-टाइम डिजिटल मॉनिटरिंग’ व गुप्त माहितीवर आधारित कारवाई, गवताळ कुरणांची निर्मिती व सौरऊर्जेवर चालणार्या पाणवठ्यांची उभारणी व देखभाल, भक्षक-भक्ष्य संतुलन राखण्यासाठी तसेच अधिवास जोडणीसाठी स्थानांतरणासारख्या धोरणात्मक उपाययोजना आदी विषयावर अधिकार्यांनी माहिती दिली.
सायंकाळी प्रतिनिधीमंडळाने ताडोबा परिसरातील स्वच्छतेसाठी प्रसिद्ध असलेल्या सातारा गावाला भेट दिली. यानंतर पारंपरिक आदिवासी नृत्य सादर करण्यात आले, ज्यातून मध्य भारताच्या समृद्ध सांस्कृतिक वारशाचे दर्शन घडले. भेटीच्या शेवटी क्षेत्र संचालक तसेच वनाधिकारी यांच्यासोबत संवाद सत्र आयोजित करण्यात आले. ब्रिक्स प्रतिनिधींनी ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प प्रशासनाच्या कार्याचे कौतुक करीत भारताच्या ब्रिक्स अध्यक्षपदादरम्यान संवर्धन क्षेत्रात घेतलेल्या पुढाकारांचेही विशेष अभिनंदन केले.