घुग्घूस,
death-due-to-drowning : धानोरा गावातून वाहणार्या वर्धा नदीत कपडे धुण्यासाठी गेलेल्या राजू कोडापे (40), अर्पिता राजू कोडापे (12) या वडील आणि मुलीसह त्यांची भाची प्रियांका मडावी (14) या तीन जणांचा नदीच्या पात्रात बुडून मृत्यू झाल्याची दुर्देवी घटना मंगळवार, 28 एप्रिल रोजी घडली. या घटनेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
राजुरा तालुक्यातील खामोना येथील राजु कोडापे यांची बहीण धानोरा येथे राहात असल्याने ते आपल्या मुलीसह बहीणीकडे धानोरा येथे आले होते. मंगळवारी सकाळी 11 वाजताच्या सुमारास चंद्रपूर-गडचांदूर मार्गावरील धानोरा गावातून वाहणार्या वर्धा नदीवर राजू कोडापे आपली मुलगी अर्पिता कोडापे, भाची प्रियांका मडावी तसेच रोहन मडावी व सलोनी मडावी यांच्यासह कपडे धुण्यासाठी गेले होते. राजू कोडापे त्यांची मुलगी अर्पिता कोडापे व भाची प्रियांका मडावी हे तिघे जण अंघोळ करण्यासाठी नदीत गेले असता पाण्याचा अंदाज न आल्याने ते खोल पाण्यात बुडाले. यावेळी त्यांच्यासोबत असलेले रोहन मडावी व सलोनी मडावी यांनी त्यांना वाचविण्याचा प्रयत्न केला. परंतु, त्यांना अपयश आले.
या घटनेची माहिती मिळताच घुग्घुस पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत शोधमोहीम सुरू केली. यावेळी चंद्रपूर येथून बचाव पथकाला पाचारण करण्यात आले. बोटीने शोधमोहीम राबविण्यात आली. परंतु, त्यांचा मृतदेह आढळला नाही. या दुर्दैवी घटनेमुळे धानोरा गावात शोककळा पसरली आहे.