अनिल कांबळे
नागपूर :
सायबर गुन्हेगारांनी 'Digital arrest' ‘डिजिटल अटक’करण्याची भीती दाखवत निवृत्त रेल्वे अधिकारी आणि त्यांच्या पत्नीची तब्बल 33 लाख रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला. आठवडाभर चाललेल्या या फसवणुकीत पीडितांकडून मुदत ठेवी माेडून पैसे विविध खात्यांमध्ये वर्ग करण्यात आले.
'Digital arrest' सायबर गुन्हेगारांनी स्वतःला दहशतवाद विराेधी पथकाचे (एटीएस) अधिकारी असल्याचे सांगत वृद्धाशी संपर्क साधला. त्यांनी पीडिताच्या बँक खात्याचा वापर दहशतवादी कारवायांमध्ये झाल्याचा खाेटा दावा केला. त्यांना व्हाॅट्सअॅपवर वरिष्ठ अधिकाऱ्याशी व्हिडिओ काॅलद्वारे बाेलून देत विश्वास संपादन केला. पीडिताचे नाव, पत्ता आणि इतर वैयक्तिक माहिती सायबर गुन्हेगारांनी आधीपासूनच मिळवली हाेती. त्यांनी भीती निर्माण करून पैसे तीन खात्यांमध्ये वळती करण्यास भाग पाडले. पुढे हे पैसे 75 हून अधिक खात्यांमध्ये वळवण्यात आले. या प्रकरणी सायबर पाेलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.