हैद्राबाद,
elease date of 'Drishyam 3' मल्याळम चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेते मोहनलाल यांच्या बहुचर्चित 'दृश्यम ३' या चित्रपटाबाबत महत्त्वाची माहिती समोर आली आहे. या थरारपटाच्या प्रदर्शनाची तारीख निश्चित झाली असून, २१ मे रोजी हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या घोषणेमुळे चाहत्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून, चित्रपटाची पहिली झलक पाहण्यासाठी सर्वजण उत्सुक आहेत. दरम्यान, या चित्रपटाचा टीझर २९ एप्रिल रोजी सायंकाळी प्रदर्शित होणार असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे चाहत्यांना या बहुप्रतीक्षित चित्रपटाची पहिली झलक पाहण्याची संधी मिळणार आहे. सुरुवातीला हा चित्रपट एप्रिलच्या सुरुवातीला प्रदर्शित होणार होता, मात्र आखाती भागातील तणावपूर्ण परिस्थितीमुळे त्याचे प्रदर्शन पुढे ढकलण्यात आले.

या चित्रपटाचे दिग्दर्शन जीतू जोसेफ यांनी केले असून, अँथनी पेरुंबावूर यांनी निर्मिती केली आहे. चित्रपटात मोहनलाल यांच्यासोबत अंसिबा हसन आणि एस्थर अनिल या अभिनेत्री महत्त्वाच्या भूमिकांमध्ये दिसणार आहेत, तर संगीताची जबाबदारी अनिल जॉन्सन यांनी सांभाळली आहे. हा चित्रपट ‘दृश्यम’ मालिकेतील तिसरा भाग असून, या मालिकेने यापूर्वीही प्रचंड यश मिळवले आहे. २०१३ मध्ये प्रदर्शित झालेल्या पहिल्या भागाने विक्रमी कमाई करत नवा इतिहास घडवला होता, तर २०२१ मध्ये आलेल्या दुसऱ्या भागालाही प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद मिळाला होता. या कथानकाने प्रेक्षकांना खिळवून ठेवले असून, आता तिसऱ्या आणि अंतिम भागाबद्दल प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आहे.