घातक विळखा फास्ट फूडचा

    दिनांक :28-Apr-2026
Total Views |
वेध
चंद्रकांत लोहाणा
fast food आजच्या आधुनिक युगामध्ये आमच्या सर्व सवयी बदलल्या. ताटामध्ये काय असावे, याचे आम्हाला साधे भानही उरले नाही. आम्ही अन्नाला पूर्णब्रह्म मानणारे असूनही त्यापासून दूर होत गेलो. खाण्या-पिण्याच्या बदललेल्या सवयीने समाजाला अनेक घातक परिणामांना सामोरे जावे लागत असून घातक बळी पडणार्‍यांच्या संख्येमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. फास्ट फूडच्या अति सेवनाने शरीरावर होणार्‍या परिणामाची माहिती असूनही खाऊ घालणारे आणि खाणार्‍यांची संख्या कमी न होता ती दिवसागणीक वाढतच आहे. फास्ट फूडचे नियमित सेवन शरीरावर दीर्घकालीन आणि गंभीर परिणाम करू शकते. अशा या फास्ट फूडमध्ये भरपूर कॅलरिज, ट्रान्सफॅट, मीठ आणि साखरेचे सर्वाधिक असते. त्यामध्ये शरीराला आवश्यक असणारी जीवनसत्त्वे, खनिज आणि फायबरचे प्रमाण शून्य असते. असे पदार्थ खाल्ल्याने शरीरास त्वरित ऊर्जा मिळत असली, तरी ती ऊर्जा संपतेही तेवढ्याच लवकर. त्यामुळे शरीर सुस्त बनून माणसाच्या काम करणार्‍या क्षमतेवर त्याचा गंभीर परिणाम होतो.
 
 
fastfud
 
fast food  फास्ट फूडमधून शरीरास पोषक तत्त्व मिळत नसल्यामुळे शरीराची प्रतिकारशक्ती कमी शरीर अनेक व्याधींचे माहेरघर बनते. या फास्ट फूडपायी लहान मुले तर अक्षरशः वेडी झाली आहेत. पिझ्झा, बर्गर, नूडल्स, मोमोज, केक, पेस्ट्री यांसारख्या पदार्थांना मुलांची प्रथम पसंती असते. परिणामाची चिंता न करता पालकही आपल्या पाल्यांना आनंदाने त्याचा घास भरविण्यात धन्यता मानत आहेत. त्यामुळे पूर्वीच्या काळामध्ये शरीराला पोषक तत्त्व देणारी भाजी, पोळी, वरण, भात यांसारखे पारंपरिक पदार्थ ताटामध्ये दिसून येत नाहीत. नैसर्गिक पदार्थावर प्रक्रिया करून तयार होणारा पदार्थ शरीरासाठी अतिशय घातक आणि हानिकारक असतात. निसर्ग निर्मित वस्तूचे सेवन नैसर्गिकरीत्या केले तरच ते शरीरासाठी उपयुक्त ठरतात. फास्ट फूडमध्ये मोनोसोडियम ग्लुटामेट फार अधिक प्रमाणात वापरले जात असल्यामुळे डोकेदुखीचा त्रास होण्याची शक्यता सर्वाधिक फास्ट फूडमध्ये ट्रान्सफॅटचे प्रमाणही सर्वाधिक असते; जे शरिराला आतून पोखरण्याचे काम करते. फास्ट फूडमध्ये अधिकची साखर, चरबी व मीठ त्यास चवदार बनवितात. परंतु, या तीन पदार्थामुळे हृदयावर त्याचा गंभीर परिणाम होऊन लोक आजारी पडतात. फास्ट फूडमधील ट्रान्सफॅटमुळे रक्तामधील वाईट कोलेस्ट्रॉलची पातळी वाढून चांगल्या कोलेस्ट्रॉलची पातळी कमी होते. त्यामुळे टाईप-२ प्रकारामधील मधुमेह हा आजार होण्याचा धोका अधिक बळावतो तसेच हृदयविकाराचा धोकाही कितीतरी पटीने वाढतो. आहारामध्ये मिठाचे सेवन वाढल्याने उच्च रक्तदाबाचा त्रास होण्याचा धोका अधिक असतो.
 
 
fast food  फास्ट फूडमध्ये कॅलरिजचे प्रमाण सर्वाधिक असल्याने लठ्ठपणा हमखास वाढतो. लठ्ठपणा वाढला की, दमा आणि श्वसनासंबंधी इतर अनेक आजार होण्याचा धोका कितीतरी पटीने वाढतो. असे विष खाऊन काही काळासाठी आपली भूक भागत असली, तरी त्याच्या दुष्परिणामांची चर्चा होताना समाजामध्ये कधीच दिसून येत नाही. ज्या व्यक्तींना फास्ट फूड खाण्याची सवय आहे, अशा व्यक्तींना नैराश्याने बाधित होण्याची शक्यता ५१ टक्के अधिक असते. तर, दुसरीकडे शरीरामधील हार्मोन्सवर त्याचा परिणाम होऊन प्रजनन क्षमतेवरही त्याचे गंभीर परिणाम होत असल्याचे अभ्यासकांनी वर्तविले आहे. फास्ट फूडच्या अति सेवनाने घातक आजारांचे प्रमाण वाढत असतानाच मागील दोन दशकामध्ये हे आजार होण्याचे वयही २५ ते ३० वर्षे एवढे खाली आले आहे. फास्ट फूड तयार करताना ते अधिक काळ पाकिटामध्ये टिकावे यासाठी त्यामध्ये अनेक रसायनांचा भडीमार केलेला असतो. आपणास या सर्व बाबींची कल्पना असूनही पूर्णपणे डोळेझाक करून दिवसेंदिवस त्या विषाच्या आहारी आम्ही जात आहोत. शरीराला अपाय करणारे पदार्थ जर ठासून पोटामध्ये भरत राहिलो तर त्याची प्रतिक्रिया निश्चित होणार, हे आम्हाला समजत असले, तरी ते उमगत नाही, ही शोकांतिका आहे. पैसे खर्च करून आम्ही आजार विकत घेत आहोत आणि त्या आजाराच्या दुरुस्तीसाठी लाखो रुपये खर्च करून धन्यता मानण्यात आयुष्याची राखरांगोळी करीत आहोत. देशाचे भविष्य घडविणार्‍या पिढ्या अशा प्रकारे कमजोर होत गेल्या तर भविष्यामध्ये आपल्या पुढ्यात काय ठेवले असेल, हे सांगण्यासाठी कोण्या भविष्यवेत्त्याची गरज नक्कीच नाही. 
 
९८८१७१७८५६