पाणी व स्वच्छतेत घोडसगावची झेप

ग्राम स्वच्छता अभियानात द्वितीय क्रमांक

    दिनांक :28-Apr-2026
Total Views |
अमरावती, 
gram-swachhta-mission : संत गाडगे बाबा ग्राम स्वच्छता अभियान अंतर्गत राष्ट्रसंत तुकडोजी महाराज स्वच्छ ग्राम स्पर्धेत अंजनगाव तालुक्यातील घोडसगाव ग्रामपंचायतीने उल्लेखनीय यश संपादन केले आहे. सन २०२५-२६ या वर्षासाठी अमरावती विभागातून घोडसगावला द्वितीय क्रमांक प्राप्त झाला असून, पुढील राज्यस्तरीय स्पर्धेसाठी पात्रता मिळवली आहे. याबाबत विभागीय आयुक्त कार्यालयाकडून अधिकृत पत्राद्वारे माहिती देण्यात आली आहे.
 
 
lk
 
 
 
शासनाच्या पाणी पुरवठा व स्वच्छता विभागामार्फत दरवर्षी गट, जिल्हा, विभाग व राज्य पातळीवर ही स्पर्धा राबविण्यात येते. या स्पर्धेत पाणी गुणवत्ता व पाणी व्यवस्थापान, स्वच्छता उपक्रमांची प्रभावी अंमलबजावणी, घन व द्रव कचरा व्यवस्थापन, शौचालय वापराची स्थिती तसेच ग्रामस्थांचा सक्रिय लोक सहभाग या निकषांवर मूल्यमापन केले जाते. घोडसगाव ग्रामपंचायतीने स्वच्छतेबाबत व्यापक जनजागृती करत शाश्वत उपक्रमांची प्रभावी अंमलबजावणी केली. घराघरात शौचालयांचा वापर सुनिश्चित करणे, नियमित स्वच्छता मोहिमा राबविणे, कचरा व्यवस्थापनाची कार्यक्षम प्रणाली उभारणे आणि पाणीपुरवठा व्यवस्थेचे सुयोग्य नियोजन या बाबींमुळे गावाने हा मानाचा बहुमान मिळवला.
 
 
या यशाबद्दल जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सत्यम गांधी, पाणी व स्वच्छता विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी बाळासाहेब रायबोले तसेच पंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्रीराम कुलकर्णी यांनी घोडसगाव ग्रामपंचायतीचे अभिनंदन केले आहे. पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देत इतर गावांनीही या आदर्शाचे अनुकरण करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
 
 
घोडसगावची सातत्यपूर्ण यशस्वी कामगिरी
 
 
यापूर्वीही विविध अभियानात घोडसगाव ग्रामपंचायतीने उल्लेखनीय कामगिरी केली आहे. संत गाडगे बाबा ग्राम स्वच्छता अभियानांतर्गत सन २०२५-२६ मध्ये गटस्तर प्रथम, जिल्हास्तर प्रथम व विभाग स्तर द्वितीय, अश्या प्रकारे उत्कृष्ट कामगिरी करत एकत्रित १५ लाख ६० हजा इतक्या पुरस्कार निधीसाठी ग्रामपंचायत पात्र ठरली आहे.