मुंबई,
revitalization-of-polluted-rivers : महाराष्ट्रातील वाढत्या नदीप्रदूषणाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. राज्यातील ५४ प्रदूषित नद्यांचे पुनरुज्जीवन करण्यासाठी ‘महाराष्ट्र नदी पुनरुज्जीवन प्राधिकरण’ सक्रिय करण्यात आले असून, या प्राधिकरणाच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री असतील. या माध्यमातून राज्यातील प्रमुख नद्यांची स्वच्छता, संवर्धन आणि पुनरुज्जीवन यावर लक्ष केंद्रित केले जाणार आहे.
या उपक्रमांतर्गत नद्यांमध्ये सोडले जाणारे सांडपाणी, औद्योगिक घाण आणि इतर प्रदूषणाचे स्रोत नियंत्रित करण्यासाठी ठोस उपाययोजना राबवण्यात येणार आहेत. यासाठी विविध विभागांमध्ये समन्वय साधून काम केले जाणार असून, स्थानिक प्रशासनालाही यामध्ये सक्रिय भूमिका दिली जाणार आहे.
सरकारच्या मते, नद्यांचे प्रदूषण कमी करून त्यांना पुन्हा स्वच्छ आणि जिवंत करण्याचा हा दीर्घकालीन प्रयत्न आहे. यामुळे पर्यावरण संतुलन राखण्यास मदत होईलच, शिवाय पिण्याचे पाणी, शेती आणि जैवविविधतेलाही मोठा फायदा होणार आहे.
या प्राधिकरणाच्या माध्यमातून नदीकाठ संवर्धन, जलशुद्धीकरण प्रकल्प आणि जनजागृती मोहिमांनाही चालना दिली जाणार आहे. राज्यातील नद्यांचे अस्तित्व टिकवण्यासाठी हा निर्णय महत्त्वाचा मानला जात आहे.