मुंबई,
water-cut : मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे. मुंबई शहरात १५ मेपासून १० टक्के पाणीकपात लागू केली जाणार आहे. शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमधील जलसाठा मोठ्या प्रमाणात घटल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे. सध्या सर्व धरणांमध्ये मिळून केवळ सुमारे २७ टक्के पाणी शिल्लक राहिले आहे, त्यामुळे उपलब्ध पाण्याचे योग्य नियोजन करण्यासाठी ही कपात आवश्यक ठरली आहे.
वाढत्या उन्हामुळे धरणांमधील पाणी झपाट्याने आटत आहे आणि पाण्याची मागणीही वाढत आहे. त्यामुळे उपलब्ध साठा जुलैपर्यंत पुरावा यासाठी प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे. याशिवाय राज्य सरकारकडून अतिरिक्त पाणी मिळवण्यासाठीही प्रयत्न सुरू आहेत.
पावसाळा उशिरा येण्याची शक्यता आणि हवामानातील बदल यामुळे पाण्याची टंचाई निर्माण होऊ नये, यासाठी हा निर्णय महत्त्वाचा मानला जात आहे. नागरिकांनी पाण्याचा वापर जपून करण्याचे आवाहनही प्रशासनाकडून करण्यात आले आहे.