गोमाताचे संरक्षण करून राष्ट्रमाता घोषित करा

(राष्ट्रपती, पंतप्रधान, राज्यपाल, मुख्यमंत्री यांना निवेदन सादर)

    दिनांक :28-Apr-2026
Total Views |
कुरखेडा, 
gadchiroli-news : गो सन्मान अभियानाच्या अंतर्गत संपूर्ण भारतभर गोमातेचे संरक्षण करून तिला राष्ट्रमाता घोषित करा, या प्रमुख मागणीसह विविध मागण्यासंदर्भात सोमवारी अभियान करण्यात आले. त्याचाच भाग म्हणून कुरखेडा येथे तहसीलदारांमार्फतीने देशाचे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, राज्यपाल आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना गो प्रेमी बांधवांच्या वतीने निवेदन सादर करण्यात आले.
 

k 
 
निवेदन सादर करतांना ह.भ.प. मिश्रा महाराज, ह. भ. प पुंडलिकराव नागपूरकर महाराज, नानाजी खुणे, चांगदेव फाये, उमेश वालदे सुखदेव कापगते, विनोद नागपूरकर, कृष्णा चंद्रमा, रमेश बावनथडे, रुपाली कावळे, राहुल गिरडकर, बालू रहांगडाले, दिलीप कोनपत्तीवार, बळीराम पंधरे यांच्यासह गोप्रेमी व गोभक्त उपस्थित होते. यावेळी उपस्थितांनी भारतीय संस्कृतीच्या जतनासाठी गोमातेचा सन्मान वाढविणे आवश्यक असल्याचे मत व्यक्त केले.
 
 
गो सन्मान अभियानाचे मुख्य उद्दिष्ट म्हणजे अहिंसक मार्गाने व संविधानाच्या चौकटीत राहून गाईला राष्ट्रीय स्तरावर सन्मान मिळवून देणे हे आहे. यासाठी केंद्र व राज्य सरकारने पुढील मागण्या तातडीने पूर्ण कराव्यात, अशी मागणी करण्यात आली आहे.
यामध्ये देशभर गोहत्येवर संपूर्ण बंदी घालावी, गाईला राष्ट्रमाता, राष्ट्रीय देवी, राष्ट्रीय पूजा व राष्ट्रीय वारसा किंवा राष्ट्रीय पाया असा दर्जा द्यावा, गोसेवेसाठी स्वतंत्र केंद्रीय कायदा व मंत्रालय स्थापन करावे, गोचर बोर्ड स्थापन करावे, चारा सुरक्षा धोरण स्थापन करावे, गोआधारित शेती सुनिश्‍चित करावी तसेच पंचगव्य उत्पादन व उत्पादनाचे वितरण वाढवावे, अशा विविध मागण्यांचाही समावेश आहे. या निवेदनाद्वारे शासनाने लवकरात लवकर सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी अपेक्षा गोप्रेमी बांधवांनी व्यक्त केली आहे