महिलेचा शिरच्छेद करून मृतदेह जाळला

    दिनांक :28-Apr-2026
Total Views |
जामोद (प्रतिनिधी),
जळगाव,
rajura-crime-news : तालुक्यातील राजुरा लघु प्रकल्पाजवळील परिसरात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. शेतशिवारात एका अज्ञात महिलेचा मृतदेह आढळून आल्याने संपूर्ण परिसरात भीती आणि खळबळ पसरली आहे. ही महिला अंदाजे २५ ते ३० वर्षे वयोगटातील असल्याचे सांगितले जात आहे.
 

rajura-crime-news
 

ग्रामस्थांना संशयास्पद स्थितीत मृतदेह दिसताच त्यांनी तात्काळ पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून तपास सुरू केला. प्राथमिक पाहणीत हा प्रकार गंभीर गुन्ह्याशी संबंधित असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. ओळख पटू नये म्हणून मृतदेहावर पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केल्याची शक्यता पोलिसांकडून व्यक्त केली जात आहे.

 

घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनीही घटनास्थळी भेट दिली. स्थानिक गुन्हे शाखा, न्यायवैद्यक तज्ज्ञ आणि श्वान पथकाला तपासासाठी पाचारण करण्यात आले. दिवसभर पोलिसांनी परिसरात तपास करून विविध धागेदोरे गोळा करण्याचा प्रयत्न केला.

 

मृत महिलेचे वय साधारण २० ते ३० वर्षे असून उंची सुमारे पाच फूट आहे. अंगावर हिरव्या रंगाचा टॉप, गडद रंगाची पॅन्ट आणि गुलाबी रंगाच्या चपला असल्याची माहिती देण्यात आली आहे. तिच्या हातात काही विशिष्ट खुणाही आढळल्या आहेत.

 

मृतदेह पुढील तपासणीसाठी ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आला असून सायंकाळपर्यंत तिची ओळख पटू शकली नव्हती. पोलिसांनी नागरिकांना आवाहन केले आहे की, या वर्णनाशी मिळतीजुळती महिला बेपत्ता असल्यास तात्काळ पोलिसांशी संपर्क साधावा. दरम्यान, या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून पोलिसांकडून सखोल तपास सुरू आहे.